शिवणी। किनवट तालुक्यातील शिवणी आप्पारावपेठ या परिसरात मागील काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर मूळकुज व खोडकुज अशा स्वरूपाचे रोग मोठ्या प्रमाणात आढळून आल्याने अनेक शेतकरी बांधव अडचणीत आले आहेत. सोयाबीन पिकावर पहिल्यांदाच असे रोग आल्याने या रोगावर काय उपाय करावा असे अनेक प्रश्न शेतकऱ्या समोर निर्माण झाले.
यातच काही शेतकरी बांधवांनी या संबंधि तालुका कृषी विभागाकडे धाव घेतले होते याची दखल घेत तालुका कृषी अधिकारी बी.बी. मुंडे यांनी तात्काळ शिवणी आप्पारावपेठ या भागात दिनांक १८ सप्टेंबर रोजी थेट शेतकऱ्यांच्या बाधावर जाऊन पाहणी केली. तर सोयाबीन पिकावर येणारे मूळकूज व खोडकुज यास इंग्रजीत ‘चारकोल रॉट’ असे म्हणतात हे रोग गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचा खंड,दिवसाचे साधारण ३० ते ३२ अंश सेल्सिअस पर्यंत वाढलेले तापमान या मुळे ‘चारकोल रॉट’ रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे.
काही मंडळामध्ये फुले संगम,जेएस -९३०५ या वानावर रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात दिसून येत आहे.तर ह्या रोगाचे लक्षण असे की,सुरुवातीला शेताच्या उताराच्या किंवा पाणी साचत असलेल्या काही पट्ट्यामध्ये झाडाची पाने जमिनीकडे झुकू लागतात, तर या झाडांना जास्त वारे लागले की खाली पडतात. या सोबतच पाने पिवळी पडत असली तरी गळून पडत नाहीत. चारकोल रॉट या प्रादूर्भावामुळे नियमित वेळेच्या आधीच पीक वाळण्याची प्रक्रिया सुरू होते.
अशी झाडे उपटून मुळ्या तपासल्या असता मुळ्याची साल अलगद निघून येते मुळे पांढरे पडणे ही प्रार्थमिक अवस्था आहे. परंतु पीक पूर्णपणे वाळून मुळावर करड्या भुरकट रंगाची बुरशी फळे दिसत असतात ही शेवटची अवस्था असून अशी झाडे दुरुस्त होण्या पलीकडे गेल्याचे समजावा. अशी झाडे काढून त्यांचा योग्य पद्धतीने विल्हेवाट लावावी असे त्यांनी सांगितले.तर ‘चारकोल रॉट’ या प्रदूर्भावाने प्रार्थमिक अवस्थेत असलेल्या सोयाबीन पिकावर विविध उपाय योजना खालील प्रमाणे सांगितले आहे.
उपाययोजना -रोग प्राथमिक अवस्थेत असल्यास म्हणजे सुरुवातीला काही भागांमध्ये पीक पिवळे पडलेले दिसत असेल तर पुढील उपाययोजना करावी यात ओलिताची सोय असल्यास प्रथम एक संरक्षित ओलीत करणे जरुरी आहे फुलोरा व पुढील अवस्थेतील असलेल्या पिकाला या स्थितीमध्ये पाण्याची अत्यंत आवश्यकता आहे कोरड्या जमिनीतून मुळे अन्नद्रव्य शोषू शकत नाही त्यात ट्रायकोडर्मा या जैविक बुरशी नाशकाची पाच ते दहा ग्राम प्रति लिटर याप्रमाणे रोगाची लक्षणे दिसत असलेल्या पट्ट्यामध्ये आळवणी करावी. यामुळे रोगाची तीव्रता कमी होईल तसेच प्रसार रोखला जाईल ज्यांचे कडे संरक्षित ओलीत उपलब्ध नाही त्यांनी पिकामध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता येण्यासाठी व अन्यद्रव्य पुरवण्याच्या दृष्टीने पोटॅशियम नायट्रेट १३.०.४५ या विद्राव्य खताची साधारणपणे दहा ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी फवारणी करून घ्यावी.
या रोगाचा प्रादुर्भाव गेल्या एक दोन महिन्यापासून नियमित दिसत असल्यास अशा ठिकाणी पुढील वर्षी सोयाबीन पीक घेणे टाळावे फेरपालट करावा कारण या रोगाच्या बुरशीचे बीजाणू पाच ते सात वर्षे जमिनीत राहतात त्यांना पोषक वातावरण संवेदनशील वाण मिळाल्यास पीक शेंगा वाढीच्या अवस्थेत असताना रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात वाढ होऊ शकतो असे तालुका कृषी अधिकारी बी.बी.मुंडे यांनी अप्पारावपेठ येथील शेतकऱ्यांना मूळकूज, व खोडकुज म्हणजेच ‘चारकोल रॉटचा’ प्रादुर्भाव प्रार्थमिक स्वरूपात होत असलेल्या सोयाबीन पिकावरच्या प्रसारावर उपाय करण्याचे सांगितले. या वेळी अप्पारावपेठ येथील सदन शेतकरी विनायकराव देशमुख सह अनेक शेतकरी उपस्थित होते.
सदरील माहिती सर्व शेतकऱ्यांना मिळावी म्हणून अप्पारावपेठ येथील ग्रामपंचायत मध्ये शेतकरी मेळावा घेऊन सदरील सोयाबीन पिकावर होत असलेल्या रोगावर उपाययोजना सांगितले.या वेळी तालुका कृषी अधिकारी बी.बी.मुंडे यांच्या सह पोलीस पाटील भूमारेड्डी लोकावार,महसूल मंडळधिकारी पी.आर. लाठकर,तलाठी विश्वास फड,कृषी विभागाचे मंडळ कृषी अधिकारी श्री.एलपलवाड,तालुका तंत्र व्यवस्थापक आत्माचे शिवप्रकाश पटवे,कृषी पर्यवेक्षक जी.जी.डवरे कृषी सहाय्यक पांडे,एस.एस. दांडेगावकर सह सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
शिवणी , अप्पारावपेठ या भागातील संपुर्ण गावात सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहे. मागील जुलै महिन्यात तीन ते चार वेळेस अतिवृष्टी झाली यात अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन, कापूस,हळद,मूग,उडीद हे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ,काही ठिकाणी वाहून गेले.त्यातून उरले सुरले उमाटावरील शेतीमधील सोयाबीन येईल असे वाटले होते.परंतु ऐन वेळी सोयाबीन पिकावर मूळकूज ,खोडकुज ‘चारकोल रॉट’ ह्या रोगाच्या प्रादूर्भावामुळे शेतातील सोयाबीन पिवळे पडून अक्षरशः वाळुंन जात आहे यामुळे शेतकऱ्यांचे नुकसानीने होत ते नव्हते झाले.करिता शंभर टक्के नुकसान भरपाई व पीकविमा मंजूर करून सरकार शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी विनायकराव देशमुख अप्पारावपेठ यांनी केली आहे.