नायगाव, रामप्रसाद चन्नावार। मतदार यादीपासून कोणताही घटक वंचित राहु नये. याची दक्षता सर्वांनी घ्यावी, असे आवाहन उपजिल्हाधिकारी स्वाती दाभाडे यांनी केले आहे.
लोकशाहीची प्रक्रिया सुदृढ आणि निकोप होण्यासाठी नायगाव तालुक्यातील मतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत. मतदार यादीपासून कोणताही घटक वंचित राहू नये यासाठी निवडणूक यंत्रणा सतर्कपणे काम करीत आहे. यासाठी बिएलओंची प्रत्येक मतदार केंद्रात नियुक्ती करण्यात आली आहे. महिलांनी कुठलीही अडचण न सांगता मतदार यादीत नावे नोंदवावीत असे आवाहन त्यांनी केले आहे.
नायगाव तालुक्यात १ लाख ४६ हजार ९३९ एवढी मतदार संख्या आहे. त्यापैकी १ लाख ४१ हजार ५६९ मतदारांची म्हणजे ९६.८६ टक्के पडताळणी पूर्ण झाली आहे. ४ हजार ६१६ मतदारांची पडताळणी करण्याचे काम बाकी असून लवकरच ते पूर्ण करण्यात येईल. अशी माहिती स्वाती दाभाडे यांनी पत्रकार परिषदेत बोलतानां दिली. तालुक्यात १७१ मतदार केंद्र आहेत. त्यापैकी सुजलेगाव येथील दोन या बरोबरच कोकलेगाव, कुंटूर तांडा व टेभुर्णी या पाच मतदान केंद्रावर अपुऱ्या सुविधा पाहता तेथे पर्यायी बदल करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले.
दि. १ जानेवारी २०२४पर्यंत मतदार बिनचूक मतदार यादी निर्माण करण्याचे काम करण्यात येणार आहे. यापूर्वी मतदार यादीत नाव नोंदणी करणे, छायाचित्रासह अन्य अचुक माहितीची नोंद करुन लोकशाही प्रक्रिया सक्षम करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. १८ वर्ष पूर्ण झालेल्या युवक-युवतींनी आपली नावे मतदार यादीत नोंदवावी या कामी मुली-महिला मागे राहूनयेत तसेच मतदारयादीपासून भटके, वंचित, सेक्सवर्कर यांचाही मतदार यादीत समावेश झाला पाहिजेत युवक युवतींनी जास्तीत जास्त नाव नोंदवावी असे त्या पत्रकार परिषदेत म्हणाल्या.