हिमायतनगर,अनिल मादसवार। शहर व तालुका परिसरात आज दुपारी साडेबारा ते 3 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला. विजांचा कडकडाट आणि वादळीवाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसात वीज पडून तालुक्यातील मौजे एकंबा परिसरातील एका महिला शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, शेतकऱ्यावर अस्मानी संकटाचा तडाका सुरूच असल्याचे या दुर्दैवी घटनेवरून दिसून येत आहे. शांताबाई पुंजाराम खंदारे असे मयत शेतकरी महिलेचं नाव आहे.
मयत महिलेचे पती पुंजाराम विठ्ठल खंदारे यांच्या नावाने शेत सर्वे क्रमांक 42 मध्ये 4 एकर शेती आहे. दररोजच्या प्रमाणे आजही त्या शेतीकामा निमित्ताने गेल्या होत्या. शेतात जाऊन उडदाच्या शेंगा तोडत असतांना दुपारी वादळी वारे, विजांचा कडकडाट होऊन पाऊस आल्याने त्यांनी बाजूलाच असलेल्या लिंबाच्या आणि ऐळ्याच्या झाडाखाली आसरा घेतला. दरम्यान दुर्दैवाने याच ठिकाणी वीज कोसळली, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती मिळताच आ माधवराव पाटील जवळगावकर यांनी भेट देऊन, तहसीलदार यांना मयत महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना तात्काळ शासकीय मदत मिळाली पाहिजे अश्या सूचना दिल्या.
हिमायतनगर तालुक्यात आज तिसऱ्यांदा ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे नदी नाल्या काठावरील बहुतांश शेतात पाणी पाणी झाले असून, अनेक शेतकऱ्यांनी कापून ठेवलेले सोयाबीनचे देखील पाण्यात भिजून मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तात्काळ पंचनामा करून शासनाने शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी केली जात आहे. यापूर्वी देखील झालेल्या ढगफुटी सदृश पावसामुळे नदी नाल्याच्या काठावरील तसेच हिमायतनगर शहर परिसरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र आतापर्यंत शेतकऱ्यांना काहीच मदत मिळाली नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे त्यात आजचा पाऊस म्हणजे आसमानी संकटाची भरत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखवले आहे.