Home देश-विदेश दिवाळीपूर्वी खाण कामगारांना थकीत वेतन द्यावे – पालकमंत्री विजय वडेट्टीवार -NNL

दिवाळीपूर्वी खाण कामगारांना थकीत वेतन द्यावे – पालकमंत्री विजय वडेट्टीवार -NNL

चंद्रपूर| ऑक्टोबर: कर्नाटक पावर कॉर्पोरेशन लिमिटेड व बरांज कोल माईन्स येथे काम करणाऱ्या कामगारांचे वेतन दिवाळीपूर्वी देण्याचे निर्देश पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी खाण प्रशासनाला दिले. मागील 10 महिन्यांपासूनचे वेतन अद्यापही मिळाले नाही. परिणामी या कामगारांच्या कुटुंबीयांची उपासमार होत आहे. तरी दिवाळीपूर्वी कामगारांना तातडीने 4 महिन्याचे थकित वेतन देण्याची अंमलबजावणी करावी, असे पालकमंत्री यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात कर्नाटक पावर कॉर्पोरेशन लि. व बरांज कोल माईन्स येथील कामगारांच्या किमान वेतन संबंधाने व इतर तक्रारीबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यासमवेत आमदार प्रतिभाताई धानोरकर, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वरोराचे उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, मुलचे उपविभागीय अधिकारी श्री.खेडकर, बल्लारपूरचे तहसीलदार संजय राईंचवार, जिल्हा खनिकर्म अधिकारी श्री. नैताम प्रामुख्याने उपस्थित होते.

सर्व कामगारांना तातडीने किमान वेतन देण्याचे नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री वडेट्टीवार म्हणाले, केपीसीएलकडे खाण सुरू झाल्यापासून कामगारांचे 21 महिन्याचे वेतन प्रलंबित आहे. त्यापैकी कामगारांना दिवाळीपूर्वी 4 महिन्याचे वेतन देण्याचे करावे व उर्वरित 6 महिन्याचे वेतन डिसेंबर अखेरपर्यंत देण्यात यावे. व शिल्लक राहिलेल्या 11 महिन्याचे वेतन किमान वेतन ठरविल्यानंतर देण्यात यावे. कामगारांना वेतन न दिल्यास खाणीचे कामकाज बंद करण्यात येईल अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

महाऔष्णिक विद्युत केंद्र प्रकल्पग्रस्त पुनर्वसन सायवन, आवंढा, कचराळा व गुंजाळा येथील पुनर्वसितांना भूखंडाचे पट्टे वाटप करून देण्यासंदर्भात पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांनी आढावा घेतला. जमिनीचे पैसे भरून मालकी हक्काचे पट्टे देण्याची कार्यवाही तातडीने करावी. व माहे नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जमिनीचे पट्टे तातडीने वाटप करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

त्यासोबतच, कोरोना आजाराने दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना 5 लक्ष रुपयांचे फिक्स डिपॉझिट पालकमंत्री श्री. वडेट्टीवार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हा महिला बालविकास अधिकारी दीपक बानाईत, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर व कल्पना राजूरकर उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!