Home आर्टिकल्स एक मुक्तीनायकः वीर बिरसा मुंडा -NNL

एक मुक्तीनायकः वीर बिरसा मुंडा -NNL

ब्रिटिशांनी भारत देशात दिडशे वर्षे राज्य केले. ‘फोडा आणि राज्य करा’ही त्यांच्या नितींचा अवलंब करुन जुलमी सत्ता राबविली. पण या अत्याचारी सत्तेविरुद्ध आपल्या राष्ट्रभक्त व शूर वीरांनी शांती,अहिंसा तर कधी शस्त्र हातात घेवून एवढेच नाही तर आपल्या प्राणांची आहूती देवून त्यांना देशातून हाकलून देवून देशाला स्वतंत्र केले. या स्वातंत्र्य संग्रामात झारखंड आणि प्रामुख्याने छोटा नागपूरच्या मुंडा जनजाती आदिवासींचा सिंहाचा वाटा आहे. त्यामध्ये मुंंडा जनजातीतील वीर बिरसा मुंडा यांच्या कार्याचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. दि.१५ नोव्हेंबर वीर बिरसा मुंडा यांचा जन्म दिवस. त्यांच्या जयंती निमित्त त्यांच्या कार्यावर टाकलेला प्रकाश.

वीर बिरसा मुडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५साली उलीहातू या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सुगना मुंडा आणि आईचे नाव कर्मी होते. बिरसाचे कुटुंब अत्यंत गरीब होते. तो लहानपणी बकऱ्या चारीत असे.तो सुंदररित्या बासरी वाजवित असे. त्यांच्या बासरी वादनात एवढे माधुर्य होते की, त्या तालावर माणसे आणि पशुपक्षी तल्लीन होत असत. त्याला शिक्षणाची आवड होती. तो जर्मन मिशनरी स्कूल मध्ये दाखल झाला. तेथून तो प्रायमरी पास झाला.१८८६ साली चाईबासा येथे जर्मन स्कूल च्या उच्च माध्यमिक शाळेत प्रवेश घेतला. चाईबासा येथील शाळेत एक घटना घडली. शाळेची प्रार्थना सुरु असताना एक पादरी म्हणाला’, मुंडा सरदार सारेच सारे धोकेबाज आणि चोर आहेत.’

आपल्या जातीविरुध्द अपमानास्पद शब्द ऐकून सर्व मुंडा विद्यार्थी गप्प बसले.पण बिरसा मुंडाने मुंडा जनजातीला धोकेबाज म्हणणाऱ्या पादरीला खडसावले. तो म्हणाला,’नाही.. मुंडा लोक धोकेबाज नाहीत. मुंडा लोक चोर सुध्दा नाहीत. तुम्ही मुंडाना चोर म्हणाले,ते चोरी काय ते जाणत सुद्धा नाहीत.तुम्ही मुंडा सरदारांना धोकेबाज म्हणालात,तर त्यांनी कोणासोबत धोकेबाजी केली सांगू शकाल ?आजवर साहेब लोकांवर,ईसाई मशिनरी वर,वकील या सर्वांवर विश्वास ठेवला. मागील त्यास फिस दिली. पण त्यांनीच विश्वासघात केला.खरे धोकेबाज हे लोक आहेत.

बिरसा मुंडाच्या गर्जनेवर सर्व मिशन स्तब्ध झाले. पण त्यावर बिरसा मुंडाची शाळेतून हकालपट्टी केली गेली. भविष्यात याच बिरसा मुंडाच्या हस्ते आंदोलनास सुरुवात होणार होती. कारण सरकार एक कायदा पास करुन सिंहभूमी, मानभूमी आणि पालाओ भागात सर्व गावातील जितकी सरकारी जमीन आहे ती सर्व जमीन वनविभागाच्या अधिकारात राहील. यापुढे आदिवासी या जंगलात प्रवेश सुद्धा करणार नाहीत. आणि या कायद्यामुळे आदिवासींचा प्राचीन काळापासून या जंगलाशी असलेला सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक वारसा संपणार होता. त्यांचा जीवनाधार संपणार होता.

ज्या आदिवासींनी ईसाई धर्माचा स्वीकार केला त्या शिक्षीत लोकांनी आपल्या अधिकारासाठी जे आंदोलन केले त्याला सरदारी आंदोलन म्हणतात. हे आंदोलन १८५८ मध्ये सुरु झाले. यातील मागण्या अशा होत्या की,आदिवासी हे आदि निवासींचे वंशज आहेत म्हणून या भागातील जंगल, पहाड आणि जमिनीवर त्यांचाच अधिकार आहे. बेगारी पध्दत बंद झाली पाहिजे. स्त्रियांवरील आणि बेगारी लोकांवरील अत्याचार बंद झाली पाहिजे. संपूर्ण आदिवासी क्षेत्रात तामाड आणि कोल विद्रोही नेत्यांच्या वीर कथा प्रचारीत कराव्यात. सरदारी आंदोलन तीन कामासाठी झाले. पहिले जमिनीवरील आपल्या अधिकारासाठी १८५८-१८८१, दुसरे आंदोलन ईसाई मिशनरीशी झालेले मतभेद १८८१-१८९० आणि तिसरे आंदोलन राजनैतिक हक्कांसाठी १८९०-१८९५ पर्यंत झाले.

सगुणा बिरसाच्या वडिलांनी ईसाई मिशनरी अत्याचारातून मुक्तता होईल या हेतूने ईसाई धर्म स्वीकारला होता. पण त्यातून काहीही साध्य झाले नाही. बिरसा मुंडाने हा धर्म नाकारला. बिरसाच्या कार्याची जनजाती मध्ये लोकप्रियता वाढू लागली. बिरसामध्ये नवीन नेतृत्व उभे रहात होते. जो मार्ग एका महान इतिहासाची निर्मिती करण्याची संभावना बिरसा मुंडाची प्रतिक्षा करीत होता. १८९५ साली एक घटना घडली. बिरसा आपल्या मित्रांसोबत जंगलात फिरत असताना आकाशात वीज चमकली आणि लख्ख प्रकाशात बिरसाचे मुख मंडल शुभ्र आणि लाल दिसले. पण वीज अंगावर पडली नाही.

हि अनुभव मित्रांने त्यासोबत बोलून दाखवला तेंव्हा तो मित्राला थट्टेने म्हणाला,’असेच यापुढे अनेक चमत्कार माझ्या जीवनात घडणार आहेत. दुष्काळी दिवसात प्रदेशातील मुंडा जातीला अवर्णनीय दुःख, कष्ट त्रास सहन करावा लागत होता. एकीकडे दुष्काळी परिस्थितीला उपासमार तर दुसरी कडे शेठसावकार, सरकारी कर्मचारी,तसेच ईंग्रज लोकांचे अमानवीय अत्याचार सहन करीत अस्तित्वाची लढाई लढावी लागत होती. सर्व आशा बिरसा मुंडावर होत्या. तोच त्या समाजात सुशिक्षित मार्गदर्शक होता.तो भगवान होता.कल्याण करणारा लोक नायक होता. मुक्ती नायक होता.

बिरसाचे घर लोकांसाठी तीर्थक्षेत्र झाले होते. त्याने ईसाई धर्म झुगारून दिला होता. तो आता नवीन धर्म निर्माण करत होता. तो लोकांना शिकवण देत होता. कारण मुंडा समाजात हडळ, जादूमंतरवाले, अलौकिक शक्ती वर विश्वास ठेवणारे आणि पंडे पुरोहितांच्या प्रभावामुळे मुंडा जनजाती अंधविश्वासात जखडली होती. तो त्यांना म्हणाला,’ ईंग्रज शासनाविरुद्ध लढावयाचे असेल तर मुंडाना आपल्या परंपरा सोडण्याचे शिक्षण घ्यावे लागेल. नवीन धर्म मुंडाना युद्ध करावयास शस्त्र हातात घेण्याचे शिक्षण देईल.आणि आपले आचरण शुद्ध असावे, यासाठी काही गोष्टी तुम्हाला पालन कराव्या लागतील.

१) चोरी करणे, खोटे बोलणे पाप आहे, हत्या करणे अन्याय आहे.२) कोणीही भिक्षा मागू नये. ३) आपला सर्व समाज गरीब आहे. पुरोहित आणि ईतरांच्या आज्ञेवर विश्वास ठेवून बळी देणे, पुजा करणे बंद करा.४)अनेक देवदेवतांच्या पुजा करु नका५) भूतप्रेत,हडळ,पिशाच्च यावर विश्वास ठेवू नका. ६) मुंग्या प्रमाणे सतत परिश्रम करत रहा.७) पशुपक्ष्यांप्रमाणे एकजुटीने जीवन जगा. ८) सर्वांवर प्रेम करा. ९) ताडी, हंडिया, महुआ हे सर्व मादक पदार्थ सैतानाचे घर आहे. यापासून येणाऱ्या नशेमुळे बुध्दी जड होते, नशेच्या अवस्थेत माणूस अमानवीय कामे करतो. यांचे सेवन करु नका.. हे महान धार्मिक उपदेश बिरसा मुंडाने आपल्या जनजातीस दिला. या आदर्शवादी शिकवणूकीतून जणू त्याने बुद्धाच्या तत्त्वज्ञानाच्या सागराला स्पर्श केले असा भास होतो. हा मानवतावादी संदेश ऐकून लोक ईसाई चर्च कडून नवीन धर्माकडे येत होते.

आदिवासी जनजातींतील नवीन संघटना आणि आपल्या वरील होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध लढण्याची निर्माण झालेली जागृती पाहुन ईंग्रज सरकार त्याच्या वर लक्ष ठेवत होते.तर मुंडांना जर मुक्ती मिळाली तर त्यांच्या कष्टावर जगणारा शेठ,शावकार,जमीनदार, ठेकेदार आणि ईसाई धर्म प्रचारक यांचे नुकसान होणार होते. त्यामुळे त्यांनी बिरसा विषयी खोट्या गोष्टी सांगून इंग्रज सरकारला भडकविले.रांची येथील डेप्युटी कमिशनरने बिरसा च्या अटक आदेश काढला.

बिरसाचा खटला खुंटीच्या कोर्टात सुरु झाला. तेथे मुंडानी गर्दी केली. ही गर्दी पाहून सरकार विद्रोहाच्या भीतीने घाबरले. शेवटी हा खटला रांची कोर्टात चालला. त्यात बिरसा मुंडाला दोन वर्षे सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा झाली. ३० नोव्हेंबर १८९७ बिरसा मुंडाची सुटका झाली. फेब्रुवारी १८९८ मध्ये डोंबारी सभा बोलावली. ठिकठिकाणी संघटन केले, सभा घेतल्या.२५ डिसेंबर पासून पुन्हा आंदोलन सुरू केले. याच मुक्ती आंदोलनास मुंडारी भाषेत ‘उल गुलान’ म्हणतात.

शेवटी दिडशे शिपाई पाठवून अनेक बिरसा सैनिकास पकडून रांची येथे कोर्टात केस सुरु झाली. बिरसा मुंडाही रांची जेलमध्ये होता. ३० मे१९०० ला बिरसा मुंडाने जेवण नाकारले. त्या दिवशी तो कोर्टात बेशुद्ध होता.त्याला वैद्यकीय तपासणीत हैजा(काँलरा) नावाचा आजार सांगण्यात आला. सन ९ जूनला १९०० साली त्यास अचानक रक्ताची ओकारी आली आणि त्यातच त्याची प्राणज्योत माळवली.

आपल्या आयुष्याच्या पंचवीस वर्षात बिरसा मुंडाने जीवनाचे सोने केले.जागतिक इतिहासात आपल्या कार्याची नोंद करुन एकतेची ताकद काय करु शकते. हा जगाला धडा शिकविला. नक्कीच ही प्रेरणा आजही आपल्या साठी तितकीच महत्त्वपूर्ण आहे. बिरसा मुंडा या महानायकास, महान वीरास आज दिनी कोटी कोटी प्रणाम…

….बाबुराव पाईकराव, डोंगरकडा, 9665711514

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!