Home नांदेड इ.एम.इ. जालंधर विजेता उपविजेता आर्टलरी नाशिक – NNL

इ.एम.इ. जालंधर विजेता उपविजेता आर्टलरी नाशिक – NNL

अमरनाथ राजूरकर : महानगर पालिकेने स्पर्धा आयोजनात सहभागी व्हावे, मोहन हंबर्डे : गुरुद्वारा बोर्डाने मैदान उपलब्ध करून द्यावा

नांदेड| येथे आयोजित ४८ व्या अखिल भारतीय श्री गुरु गोबिंदसिंघजी गोल्ड अँड सिल्वर कप हॉकी स्पर्धेचे अंतिम विजेतेपद इ.एम.इ. जालंधर संघाने मिळवले. तर उपविजेता पद आर्टलरी नाशिक संघाने राखले. तृतीय स्थानी कॉर्प्स ऑफ सिंग्नल जालंधर संघ राहिला. खेळातील प्रथम विजेत्या संघाला एक लाख रुपये रोख बक्षीस आणि फिरते चषक प्रदान करण्यात आले. इ.एम.इ. जालंधर संघाने सलग दुसऱ्या वर्षी विजयते पद राखले आहे.

रविवारी दि. ९ जानेवारी रोजी सकाळी अंतिम पदासाठी आणि तृतीय स्थानासाठी सामने खेळले गेले. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष आमदार अमरनाथ राजूरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, महापौर सौ. जयश्री पावडे, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, माजी सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले, श्री अमितसिंह तेहरा, गुरुद्वारा बोर्डाचे अधीक्षक गुरविंदर सिंग वाधवा, नगरसेवक संदीप सिंग गाडीवाले, राजू येवणकर, जी. नागय्या, निलेश पावडे, सुखविंदर सिंग हुंदल, दीपसिंग फौजी उपस्थित होते. तसेच जितेंद्रसिंघ खैरा, जसपालसिंघ काहलो, हरविंदर सिंग कपूर, संदीप सिंग अखबारवाले, महेंद्र सिंग लांगरी, अमरदीप सिंग महाजन, विजयकुमार नंदे, जसबीरसिंग चिमा, महेंद्रसिंग गाडीवाले हरप्रीतसिंघ लांगरी यांची उपस्थिती आणि सहकार्य होते.

कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून बोलत असतांना आमदार अमरनाथ राजूरकर म्हणाले, श्री गुरु गोबिंदसिंघजी महाराज यांच्या जयंती निम्मित दरवर्षी दुष्टदमन क्रीडा व युवक मंडळ तर्फे हॉकीचे सामने आयोजित करण्यात येत आहेत. हे वर्ष ४८ वें वर्ष असून स्पर्धा चांगल्यास्तरावर पार पडल्या आहेत. पुढे या स्पर्धेस आर्थिक हातभार लावण्याच्या उद्देशाने नांदेडच्या महापौर जयश्री ताई पावडे यांनी स्पर्धा आयोजनात महानगर पालिकेच्या सहभागासाठी ठराव संमत करून घ्यावा. जर दुष्टदमन क्रीडा व युवक मंडळ आणि महानगर पालिका यांनी संयुक्तपणे स्पर्धेचे आयोजन केले तर हॉकी खेळाचे वैभव आणखीन वाढेल.

आमदार मोहन अण्णा हंबर्डे यावेळी म्हणाले, नांदेड मध्ये गुरु गोबिंदसिंघजी यांच्या जयंती निम्मित हॉकीचे सामने घेतले जात असल्याने खेळाडूंना खेळासाठी वातावरण मिळत आहे. पूर्वी मल्टिपर्पज हायस्कुल शाळेच्या मैदानात हॉकी आणि क्रिकेटचे सामने व्हायचे. नांदेडची ओळख शिखांची दक्षिण काशी म्हणून विद्यमान आहे. गुरुजींच्या नावाने हॉकी खेळाला प्रगत करण्याचे प्रयत्न व्हावे. आज शहरात हॉकी खेळासाठी चांगले मैदान होण्यासाठी गुरुद्वारा बोर्डाने मदत करावी.

जर गुरुद्वारा बोर्डाने मैदान उपलब्ध करून दिल्यास त्यावर चांगल्या सुविधा पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्न करूं. मा. पालकमंत्री श्री अशोकरावजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आम्ही खेळासाठी विकास करू. सभापती किशोर स्वामी यावेळी म्हणाले की आज येथे उत्स्फूर्त अशी हॉकी पाहण्याचा योग आला.

दोन्ही संघानी उत्साहपूर्ण खेळ केला. त्यांचे खेळ पाहून आमदार अमरनाथ राजूरकर आणि आमदार मोहन हंबर्डे यांना सुद्धा वाटत होते की त्यांनी सुद्धा हॉकी घेऊन मैदानात उतरावं . खेळाचे मुख्य संयोजक स. गुरमितसिंघ नवाब यांनी सर्व अतिथीगण , सर्व दानी सज्जन, सर्व सहायक संस्था, खेळाडू, तंत्र समिती, पंच आणि सहकाऱ्यांचे आभार मानले. प्रा. डॉ जुझारसिंग शिलेदार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

आजचा अंतिम सामना ई.एम.इ. जालंधर आणि आर्टलरी नाशिक संघात खेळला गेला. नाशिक संघाने सामन्यात १४ व्या मिनिटाला पहिला गोल करून उत्साह निर्माण केला. रोहितकुमार याने हा मैदानी गोल केला. जालंधर संघाने प्रतिहल्ले चढवत खेळाच्या अकरा मिनिटात तीन गोल करून खेळात उत्सुकता वाढविली. जालंधरच्या गुरजिंदरसिंग याने सामन्यात दोन केले. तर राकेश मिंज याने एक गोल केला. नाशिक संघाने पुढे आक्रमक खेळ खेळत ४१ व्या आणि ५२ व्या मिनिटाला गोल केले. हे गोल गुरप्रीतसिंघ आणि मनप्रीतसिंग यांनी केले. शेवटी हा सामना ३ गोल विरुद्ध ३ गोल असा अनिर्णित राहिला. हॉकी इंडियाच्या नियमाने पुढे ट्रायब्रेकर द्वारे सामन्याचे निकाल घेण्यात आले.

यात ई.एम.इ. जालंधर संघाने ४ विरुद्ध ३ गोल अंतराने सामना जिंकत पहिले मानांकन प्राप्त केले. नाशिकचा संघ दुसऱ्या स्थानी राहिला. तृतीय स्थानासाठी झालेल्या सामन्यात कॉर्प्स ऑफ सिग्नल जालंधर संघाने डेक्कन हैद्राबाद संघाला ४ विरुद्ध ३ असे नमवले. सुरुवातीचे तीन गोल करणाऱ्या हैद्राबाद संघाने शेवटच्या २५ मिनिटात ४ गोल स्वीकारून सामना गमावला. हैद्राबादच्या एम.ए. अलीम याने सामन्यात दोन केले तर जालंधरच्या दीपक पाल ने दोन केले.
प्रथम : एक लाख रुपये रोख व गोल्ड कप (फिरते चषक)
दुसरे : ५१ हजार रुपये रोख आणि सिल्वर कप (फिरते चषक)
तृतीय : ११ हजार रोख आणि मोमेंटो

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!