Home आर्टिकल्स वर्तमान समाजासाठी जिजाऊ एक आदर्श -NNL

वर्तमान समाजासाठी जिजाऊ एक आदर्श -NNL

राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ज्यांच्या जन्माने इतिहासाने कूस बदलली. ज्यांनी इतिहास घडवून स्वराज्याचे तोरण बांधले माणसाला माणसा सारखी  वागणूक देण्याचे इतिहासातील आद्य पाऊल राजमातेने उचलले. अशा या महान क्रांतिकारी व्यक्तिमत्त्वाचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंधखेडराजा येथे झाला.
                   
जिजाऊ अगदी स्पष्ट स्वतंत्र विचाराच्या होत्या. त्यांना आपल्या देशाबद्दल, आपल्या माणसाबद्दल नेहमीच  प्रेम वाटायचं म्हणूनच त्यांनी आपल्या पोटी जन्मलेल्या पुत्रास म्हणजेच शिवरायास देश प्रेम, माणूस प्रेम, एकनिष्ठतेचे धडे दिले ज्यामुळे छत्रपती शिवरायांनी गुलामी ,अंधाधुंद व स्वैराचार माजलेल्या काळात स्वातंत्र्याचा विचार स्वराज्य रूपाने रुजवून स्वातंत्र्य रुपी स्वराज्याचे वटवृक्षात रूपांतर केले. आणि संबंध जगाला स्वातंत्र्याच्या क्रांतीची प्रेरणा मिळाली. महाराष्ट्रात मराठा साम्राज्य निर्माण करण्यामध्ये जिजाऊंचे फार मोठे योगदान आहे. जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवरायांनी त्यांचं प्रत्येक पाऊल उचललं जिजाऊ केवळ एक स्त्री होत्या तर त्या एक शूर आई, एक धाडसी पत्नी व एक शूर योद्धा देखील होत्या कारण वेळ प्रसंगी रणांगणात उतरण्यास त्या नेहमी सज्ज असत म्हणूनच म्हणावेसे वाटते,

                 ” घडवला तू असा छावा
                   ज्याने दिला महाराष्ट्राला,
                    तुझ्या संस्काराचा नवा वसा”

शहाजीराजांच्या कार्यात जिजामाता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. आदिलशहा, निजाम मुघल अशा बलाढ्य शक्तीच्या विरोधात मोठ्या निर्भीडपणे जिजाऊंनी शहाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून आपले कार्य केलेले आहे. आज  मला प्रश्न पडतो की,आधुनिक काळातील स्त्रीयां मधली जिजाऊ आणि ही जागी झाली नाही .आजची स्त्री आपली मुले ,आपलं माहेर, माझे नातेवाईक ,कौटुंबिक कार्यक्रम याच्या पलीकडे विचारच करत नाही .परंतु जिजाऊंचा इतिहास पाहिला नंतर आम्हाला लक्षात येते की, जिजाऊंनी जाधव -भोसले कुटुंबाच्या पुढे जाऊन रयतेचा विचार केला ज्या विचाराचे फळ म्हणजे तानाजी मालुसरे, येसाजी कंक, दाजी जेधे, बाजी पालकर ,मुरारबाजी, बहिर्जी नाईक ,नेताजी इत्यादी मावळे व सर्व जातिधर्मातील वतनदार  स्वराज्यासाठी पुढे आले. म्हणजे जिजाऊंनी आपले मातृप्रेम केवळ शिवरायांवर नाही तर शिवरायां प्रमाणे सर्वांना दिले .ज्यामुळे त्या  ”  स्वराज्य माता ” म्हणून ओळखल्या जातात. हे पाहिल्यानंतर आधुनिक स्त्री किती संकुचित विचार सरणीची ,कूपमंडूक प्रवृत्तीची आहे हे लक्षात येते .म्हणून स्त्रीयांनी जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या आयुष्याची वाटचाल करावी.
                     
भारतातील स्त्रीयांवर आघात होतात, त्यांची कुंकवे  पुसण्याचे उद्योग केले जातात तेव्हा पेटून उठणा -या भारतीय स्त्रीया परमेश्वराला हे वाकवू शकतात, पराभूत करू शकतात हे जिजाऊंना सिद्ध केले. आणि आपल्या वैचारिक प्रेरणेतून पातशाही आणि निजामशाही यांचा नाश केला. अराजकतेच्या लागतेच या स्थितीत मूर्त स्वरूपात शिवराज्य त्यांनी उभे केले व विखुरलेल्या देशबांधवांना एकतेच्या सूत्रात गुंफून स्वराज्य रुपी जन चळवळीला खतपाणी घालून त्याचे सुराज्यात रूपांतर केले. ज्यांचे जीवन शौर्य,प्रचंड आत्मविश्वास, जबरदस्त इच्छाशक्ती व स्वकीयांसाठी  प्रचंड तळमळ यांनी पोत भरलेले होते.
               
जिजाऊंच्या चरित्रातून आधुनिक स्ञीयांनी, मुलींनी घेण्यासारखे खूप काही आहे. कारण वर्तमान स्थितीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा समाजामध्ये प्रचंड नैराश्य, न्यूनगंड आणि असुरक्षिततेची भावना मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली जाणवते. आजची स्त्री “चूल व मूल “चौकटीत  अडकलेली दिसून येते त्या चौकटीच्या बाहेर येण्यास तयार नाही असे म्हणण्यापेक्षा ती त्यातच सुख आहे असं समजते परंतु जेव्हा आम्ही जिजाऊ चरित्राचा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येते जिजाऊंनी विवाहाच्या  नंतर स्वराज्य संकल्पनेस मूर्त स्वरूप देण्याचे क्रांतिकारी कार्य केले आहे.

म्हणजेच कुटुंब ,नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या पुढे जाऊन स्त्री सुद्धा महत्त्वपूर्ण कार्य करू शकते याची जाणीव आम्हाला त्यांच्या कार्यातून होते. जिजाऊनी मोठ्या उद्दात व व्यापक दृष्टिकोनातून रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली जाहागिरी  किंवा आपले वतन याचाच विचार न करता संबंध रयतेचा विचार करून क्रांती घडवून आणली.  केवळ आपली जहागिरी,वतन याच्या पुढे जाऊन आपल्या रयतेला न्याय मिळाला पाहिजे ,त्यांचा मानसन्मान झाला पाहिजे, त्यांना माणूसपणाची वागणूक मिळाली पाहिजे अशी शहाजीराजे व जिजाऊंची भूमिका होती .यासंदर्भात जेव्हा आम्ही आधुनिक काळात लोकप्रतिनिधी ची भूमिका लक्षात घेतो तेव्हा लोकप्रतिनिधींच्या कार्यातून हा व्यापक दृष्टिकोन नष्ट झालेला दिसून येतो.

लोकप्रतिनिधी केवळ ” स्व “स्वार्थासाठी लोकांच्या मतावर निवडून येतात आणि आपणच अधिकाधिक कसे श्रीमंत, गडगंज होऊन यासाठी खटपट करत असलेले दिसून येतात. म्हणून सामान्य जनतेचे प्रश्न सुटण्याऐवजी अधिकच वाढलेले दिसून येतात .जर या लोकप्रतिनिधींनी राष्ट्रमाता माॅ जिजाऊ,  शहाजीराजे, छत्रपती शिवराय, संभाजीराजे यांच्या जनतेप्रती असलेल्या उद्दात दृष्टिकोनाचा विचार करून आपले कार्य केले तर नक्कीच वर्तमानकालीन वेगवेगळ्या समस्यांचे निराकरण आपल्याला करता येईल परंतु असे होत नाही हे आमचे दुर्दैव आहे. केवळ जयंती आणि पुण्यतिथी पुरते थोर विचार ऐकले जातात वाचले जातात कृती मात्र शून्य दिसून येते.
               
जिजाऊ संकटसमयी कधीही डगमगल्या नाहीत. शिवरायांना यश मिळावे ,विजय मिळावा यासाठी त्यांनी यज्ञ, शांती ,उपवास कधीही केला नाही. इतक्या त्या प्रयत्नवादी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन अंमलात आणणाऱ्या सुज्ञ माता होत्या. यश मिळवण्यासाठी हाती तलवार घ्यावी लागते, प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते ,चातुर्य पणाला लावावे लागते यावर त्यांचा दृढ विश्वास होता. म्हणजेच त्या प्रयत्नवादी होत्या छत्रपती शिवरायांवर चालून आलेल्या शत्रूंचा नायनाट करण्यासाठी त्यांनी शिवरायांना अनमोल असे मार्गदर्शन केले ज्यामुळे बलाढ्य शत्रूलाही शिवरायांच्या पुढे झुकावे लागले.

म्हणजेच संकट काळात हाताश निराश त्या कधीही झाला नाही या त्यांच्या कार्यातून आजच्या स्त्रीकडे पाहातो तेव्हा आजची स्त्री, आजची माता आपल्या मुलाचा गुणवत्ता यादीत क्रमांक यावा, तो चांगला गुणांनी पास व्हावा, त्याला चांगली नोकरी मिळावी, त्याला पदोन्नती मिळावी, त्यांना एखादी निवडणूक जिंकावी यासाठी यज्ञ ,होम ,हवन, उपास, तीर्थयात्रा, नामस्मरण करताना आढळून येते. हे लक्षात घेत नाही की ,प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते म्हणून त्या अनेक माता आपल्या कार्यात अपयशी  होत असलेल्या दिसून येतात. त्यामुळे स्त्रियांनी जिजाऊंचा प्रयत्नवाद आत्मसात केला पाहिजे तसेच आपल्या ध्येयासाठी लढले पाहिजे हे लक्षात घेतले पाहिजे जिजाऊ या लढाऊ वृत्तीच्या होत्या.आम्ही जेव्हा आजूबाजूला पाहतो त्या वेळेस हे लक्षात येते की, अनेक ठिकाणी स्त्रियांवर मोठ्या प्रमाणात अन्याय अत्याचार होतात.

त्यावेळी आधुनिक स्त्री स्वच्छ संरक्षण देखील करू शकत नाही इतका कमीपणाची भावना या स्त्रीमध्ये निर्माण झाली आहे म्हणून स्त्रीयांनी आपला जो न्यूनगंड आहे, आपल्या मनामध्ये निर्माण झालेली कमीपणाची भावना या गोष्टींचा त्याग करून जिजाऊंचे धैर्य ,त्यांचं शौर्य या गोष्टींचे अनुकरण केले तर नक्कीच समाजातील छेडछाड ,बलात्कार, हुंडाबळी ,बालविवाह, कौटुंबिक हिंसाचार, जाळपोळ, स्त्रियांकडे बघण्याचा समाजाचा दुय्यम दृष्टिकोन यावर चांगला प्रतिबंध करता येईल शिवाय समस्या मुळापासून उपटून टाकता येतील. जिजाऊंचा आणखीन एक विशेष गुण म्हणजे जिजाऊंनी शिवरायांचे आठ लग्न लावले होते दृष्टीकोण एवढाच की, स्वराज्यनिर्मितीसाठी  पाठबळ मिळावं आणि समाज संघटन  हा होता.  त्यांनी एक सासू म्हणून सुद्धा एक आदर्श भूमिका आपल्या जीवनात वठवली आहे. सासू-सुनेचं नातं जिव्हाळ्याचं ,आपुलकीचं ,विकासाचं, प्रेमाचं नातं असू शकतो हा आदर्श समोर ठेवण्याचे काम त्यांनी केले.

आधुनिक काळात माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाचे युग आलं, स्त्रीयांनी प्रत्येक क्षेत्रामध्ये धडाडीचे पाऊल टाकलं ,स्त्री अनेक गोष्टींचं अनेक क्षमता  क्षेत्रांमध्ये सिध्द करू लागली  परंतु स्त्री मधली सासू पणाची आणि सून पणाची भावना आजही संघर्षमय असलेली आढळून येते .म्हणून आधुनिक स्त्रीयांनी जिजाऊंचा आदर्श डोळ्या समोर ठेवून स्वतःला कुटुंबामध्ये पुढं आणले  पाहिजे.जिजाऊ पतिनिधनानंतर सती गेला नाही इतक्या त्या पुरोगामी विचारसरणीच्या होत्या. कारण त्यांनी स्वतः सती प्रथेला विरोध केलेला आहे. समाजामध्ये अनेक अनिष्ट प्रथा, परंपरा होत्या त्यावर  त्यांनी कडाडून टीका तर केलीच तर कृतीतून अशा गोष्टींचा बिमोड करण्याचे काम आपल्या  कार्यकाळात केलं आहे .याचाही  आदर्श आम्ही स्त्रीयांनी घेणे गरजेच आहे. काय चुकीचे आहे ,ते चूक कसे  आहे आणि ते विकास आणि प्रगतीसाठी अडथळा निर्माण करणारे आहे याची जाणीव नाहीये म्हणूनच आधुनिक स्त्रीयांसमोर अनेक प्रश्नांचे डोंगर निर्माण झालेले  दिसून येतात.
           

“आईच्या कर्तृत्वातच  मुलाचं भाग्य लपलेलं असतं असे जगज्जेते  नेपोलियन म्हणतात “आणि त्यांचा हा विचार स्वराज्य संकल्पना रुजवणाऱ्या राष्ट्रमाता माॅ जिजाऊ, स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवराय या दोन माता- पुत्रांना लागू होतो. कारण जवळ-जवळ आयुष्यभर जिजाऊनी छत्रपती शिवरायांना सुयोग्य मार्गदर्शन केले आणि तमाम गुलामगिरीच्या बेड्यात  अडकलेल्या लोकांना माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून दिला. तसे पाहिले तर जिजाऊंचा इतिहास हा नवयुग निर्मितीचा, क्रांतीचा इतिहास आहे. शिवरायांसारखे प्रखर तेजस्वी चारित्र शिल्प घडवणारे राजमातेचे हार जितके हळूवार होते तितकेच कर्तव्यकठोर होते. छत्रपती शिवरायांच्या नवनव्या मोहिमांची आखणी व त्यांची  धडपड यांना लोकहिताची जोड देण्याचं कार्य राष्ट्रमाता माॅ जिजाऊ यांनी केले.

आपल्या आजूबाजूची माणसे व त्यांच्या अडीअडचणी यांच्याकडे त्यांचे स्वतः लक्ष असे व त्यांच्या अडचणींचे निराकरण वेळोवेळी राष्ट्रमाता माॅ जिजाऊनी केलेले दिसून येते.या जिजाऊ यांच्या गुणांचा आदर्श आमच्या लोकप्रतिनिधी प्रतिनिधींनी घेणे गरजेचे आहे. कारण वर्तमान काळात लोकांसमोर निर्माण झालेले प्रश्न सोडवण्यासाठी जनता जेव्हा या लोकप्रतिनिधीकडे  जाते त्यावेळेस हे लोक प्रश्न सोडवण्या ऐवजी  इतर प्रश्‍नांची निर्मिती करत असल्याचे दिसून येतात. म्हणून आधुनिक काळात लोकशाही असून सुद्धा हुकुमशाही, गुलाम शाही असल्यासारखा भास सर्वसामान्य जनतेला होतो .परंतु जिजाऊंच्या कालखंडात राजेशाही असून सुद्धा सर्वसामान्य जनतेला सुयोग्य लोकशाहीचा उपभोग घेण्याचा हक्क जिजाऊंनी उपलब्ध करून दिला.
               
राष्ट्रमाता माॅ जिजाऊ यांच्या प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगंड मोसे इत्यादी खोर्‍यातील बाजी पालकर, झुंजारराव मारक ,तानाजी मालुसरे इत्यादी अठरापगड जातीच्या 600 सवंगड्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवरायांनी रायरेश्वराच्या  मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि सामाजिक परिवर्तनाला चालना मिळाली कारण बदल हा हळूवार होणे अपेक्षित असतं तरच तो टिकतो आणि हेच हेरुन राष्ट्रमाता माॅ जिजाऊनीं प्रयत्नवादी, सुधारणावादी वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवणूक समाजामध्ये करून स्वराज्य स्थापनेचा पाया रचला.

आणि स्वराज्य स्थापनेचा पाया असलेल्या छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी राजे व मावळे यांच्यात असणारी उच्च कोटीची नैतिकता जिजाऊंच्या संस्कारातून आलेली आहे. विखुरलेला समाज संघटित करण्याचे आणि या संघटीतपणातून महान क्रांती करण्याचे कार्य राष्ट्रमाता माॅ जिजाऊनीं केले.जिजाऊ चरिञ काही मोजक्याच घटकांना मार्ग दाखवत नाही तर समाजातल्या प्रत्येक क्षेत्रातील कार्यरत घटकांना समाज विकासासाठी दिशा देण्याचे कार्य करते. अशा या अदिव्तीय, महान, ऐतिहासिक,  वर्तमानकालीन जीवनात सर्व समाजास प्रखर ताकदीने मार्ग दाखवणा-या प्रेरणादायी व्यक्तीमत्वास आज जन्मदिना निमित्त मानाचा मुजरा !

…डाॅ सत्यभामा सतिशकुमार जाधव उमदरीकर, ता मुखेड जि नांदेड, मो. नं: -९४०३७४४७१५, ९५५२४७८७७७

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!