Home शेत-शिवार अवकाळी पावसाने रब्बीचे नुकसान होण्याची शक्यता; शेतकरी हवालदिल -NNL

अवकाळी पावसाने रब्बीचे नुकसान होण्याची शक्यता; शेतकरी हवालदिल -NNL

फळबागा, आंब्याचा मोहर करपण्याची भीती, ऊस तोडण्या खोळंबल्या

हिमायतनगर, अनिल मादसवार| शहरांसह तालुका परिसरात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाचे जोरदार आगमन झाले आहे. तासाच्या फरकाने विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट होऊन पाऊस पडत असल्याने रब्बीच्या भरवश्यावर असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा नुकसानीच्या संकटाची चाहूल लागली आहे. ऐन थंडीत अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्याने कडधान्य, फळबागा, आंब्याचा मोहर, तुरीचे नुकसान झाले आहे. तर ऊस तोडण्या खोळंबल्या असून, यामुळे मोठे नुकसान होण्याची भीतीने शेतकरी हवालदिल झाला आहे.

खरीप हानगमात होत्याचे नव्हते झाले, त्यामुळे बळीराजा सर्व नुकसानीला सामोरे जात रब्बीच्या भरवश्यावर बसला आहे. रब्बीच्या काळात शेतकऱ्यांनी गहू, हरभरा, चवळी, मूग, करडई, उन्हाळी ज्वारी, सूर्यफूल, या पिकांची पेरणी केली. पेरणी झाल्यानंतर पिके वाऱ्यावर डोलत असताना थंडीला सुरुवात झाली. हिवाळ्यातील थंडीत पडणाऱ्या दवावर ही पिके तयार होऊन शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळणार असल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र ऐन थंडीत मोसमात निसर्गात होणाऱ्या बदलामुळे व अधून मधून येणाऱ्या ढगाळ वातावरणाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली. दरम्यान दि.११ जानेवारीच्या मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावल्‍याने शेतकरी पुरते हवालदिल झाले असून, शेतकऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागणार आहे.

शेतकऱ्यांनी पेरणी केलेली रब्बी पीक फुलावर आली असताना पिकावर पडलेल्या या अवकाळी पावसाने पावसाने पिके कुजून जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तत्पूर्वी पिकाची परिस्थिती चांगली असलयाने शेतकऱ्यांनी पिकांना धोका होऊ नये म्हणून मोठ्या प्रमाणात पिकाची देखरेख करत, फवारणीसह इतर मोठ्या प्रमाणात खर्च केला. मात्र आज झालेल्या पावसामुळे केलेल्या सर्व मेहनतीवर पाणी फिरून पिकावर कीड पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. अवकाळी पावसामुळे ऊस तोडण्या खोळंबल्या असून, आंब्‍यावर आलेला मोहोर करपण्याची भीती वाटते आहे. त्यातच फळबागा आणि फूलशेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाल्याने बागायतदार शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.

सध्या तालुका परिसरात तूर काढणीला वेग लालेला आहे, बहुतांश शेतकऱ्यांनी शेतात तूर कापून ठेवली असून, या पावसामुळे तुरीचे पीक धोक्यात आले आहे. अगोदर तुरीवर मर रोगाने आक्रमण केले होते. आता अवकाळी पावसाचा कहर यामुळे शेतकऱ्याच्या हाताशी येणाऱ्या तुरीला धोका होऊन पत खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, असे झाले तर तुरीला मिळणाऱ्या भावात घट निर्माण होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. एकूणच आज झालेल्या या अवकाळी पावसाचा मोठा फटका ग्रामीण भागाला बसला असून, या अवकाळी पावसाने होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना शासनांना दिलासादायक साथ द्यावी अशी मागणीही नुकसानग्रस्त शेतकरी व्यक्त करत आहेत.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!