Home आर्टिकल्स मकरसंक्रांतीचे महत्त्व -NNL

मकरसंक्रांतीचे महत्त्व -NNL

प्रस्तावना – मकरसंक्रातीच्या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. हिंदु धर्मात संक्रांतीला देव मानले आहे. भारतीय संस्कृतीत मकरसंक्रांत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी तीळगुळाचे वाटप करून प्रेमाची देवाण-घेवाण केली जाते.सध्या सर्वत्र कोरोना महामारी मुळे नेहमीप्रमाणे सण साजरा करण्यास निर्बंध येऊ शकतात. तरीपण या निर्बंधाच्या काळात शासनाने घालून दिलेले सर्व नियमांचे काटेकोर पालन करून हा सण साजरा करू शकतो.हा सण साजरा करताना या सणाचे महत्त्व,सण साजरा करण्याची पद्धत,तीळगुळाचे महत्त्व,पर्वकाळी दानाचे महत्त्व, हळदीकुंकू करण्याचे आध्यात्मिक महत्त्व तसेच या दिवशी करायचे धार्मिक विधी याविषयीची माहिती या लेखामधून देण्याचा प्रयत्न केला आहे. याचा लाभ करून घेऊयात.

तिथी – हा सण तिथीवाचक नसून अयन-वाचक आहे. या दिवशी सूर्याचे निरयन मकर राशीत संक्रमण होते. सध्या मकरसंक्रांतीचा दिवस 14 जानेवारी हा आहे. सूर्यभ्रमणामुळे पडणारे अंतर भरून काढण्यासाठी क्वचित प्रसंगी संक्रांतीचा दिवस एक दिवसाने पुढे ढकलला जातो. सूर्याच्या उत्सवाला ‘संक्रांत’ असे म्हणतात. कर्क संक्रांतीनंतर सूर्य दक्षिणेकडे जातो आणि पृथ्वी सूर्याच्या जवळ, म्हणजे खाली जाते. यालाच ‘दक्षिणायन’ असे म्हणतात. मकरसंक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे जातो आणि पृथ्वी सूर्यापासून दूर, म्हणजे वर जाते. यालाच ‘उत्तरायण’ असे म्हणतात. मकरसंक्रांत म्हणजे खालून वर चढण्याचा उत्सव; म्हणून याला अधिक महत्व आहे.

इतिहास – संक्रांतीला देवता मानलेले आहे. संक्रांतीने संकरासुर दैत्याचा वध केला, अशी कथा आहे.
तीळगुळाचे महत्त्व – तिळामध्ये सत्त्वलहरींचे (सकारत्मक ऊर्जा ) ग्रहण अन् प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्यामुळे तीळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होते. या दिवशी महादेवाला तीळ-तांदूळ अर्पण करण्याचे अथवा तीळ-तांदूळ मिश्रित अर्घ्य अर्पण करण्याचेही विधान आहे. या पर्वाच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व मानले गेले आहे. तिळाचे उटणे, तीळमिश्रित पाण्याचे स्नान, तीळमिश्रित पाणी पिणे, तिळाचे हवन करणे, स्वयंपाकात तिळाचा वापर, तसेच तिळाचे दान हे पूर्वीपासून महत्वाचे मानले जाते.या कृती केल्याने पापक्षालन होते.म्हणून या दिवशी तीळ, गूळ, तसेच साखरमिश्रित लाडू खाण्याचे, तसेच दान करण्याचे अपार महत्त्व आहे.

सण साजरा करण्याची पद्धत – ‘मकरसंक्रांतीला सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पुण्यकाळ असतो. या काळात तीर्थस्नानाला विशेष महत्त्व आहे. गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा आणि कावेरी या नद्यांच्या काठी असलेल्या क्षेत्रावर स्नान करणार्‍यास महापुण्य लाभते.’ संक्रांतीच्या दुसर्‍या दिवसाला किंक्रांत अथवा करिदिन असे म्हटले जाते.या दिवशी देवीने किंकरासुराला ठार मारले. मकर संक्रांतीला दिलेल्या दानाचे महत्त्व – मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंतचा काळ हा पर्वकाळ असतो. या पर्वकाळी केलेले दान आणि पुण्यकर्मे विशेष फलद्रूप होतात. धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप, तसेच धार्मिक अनुष्ठान याला अत्यंत महत्त्व आहे असे सांगितले आहे.

हळदीकुंकू करण्याचे आध्यात्मिक महत्त्व – हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गादेवीचे अप्रकट तत्त्व जागृत होते अन् श्रद्धापूर्वक हळद-कुंकू लावणार्‍या जिवासाठी (व्यक्ती) कार्य करते. हळदीकुंकू करणे, म्हणजे एकप्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तीच्या लहरींना जागृत (देवीकडून येणारी सकारात्मक स्पंदने) होण्यासाठी त्यांना आवाहन करणे. हळदीकुंकवाच्या माध्यमातून जीव एकप्रकारे दुसर्‍या जिवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो. हळदीकुंकू आणि वाण देणे आदी विधीतून जिवावर (व्यक्तीवर) सगुण भक्तीचा संस्कार होण्यास, तसेच ईश्वराप्रती जिवाचा भक्ती भाव वाढण्यास साहाय्य होते.

वाण देण्याचे महत्त्व, वाण कोणते द्यावे ? – ‘वाण देणे’ म्हणजे दुसर्‍या जिवातील देवत्वाला तन, मन आणि धन यांनी शरण जाणे. संक्रांतीचा काळ सर्वाना पोषक असतोच तसेच साधना करणाऱ्यांना विशेष पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणामुळे देवतेची कृपा होऊन जिवाला इच्छित फलप्राप्ती होते. सध्या च्या काळात प्लास्टिक-वस्तू, स्टीलची भांडी आदी व्यावहारिक वस्तूंचे वाण दिल्यामुळे वाण घेणार्‍या अन् देणार्‍या अशा दोन्ही व्यक्तींमध्ये देवाण-घेवाण संबंध (हिशोब) निर्माण होतो. अधार्मिक वस्तूंचे वाण देण्याची चुकीची प्रथा सुरु आहे. खरेतर या वस्तूंपेक्षा सौभाग्याच्या वस्तू, उदबत्ती, उटणे, धार्मिक ग्रंथ, पोथ्या, देवतांची चित्रे, अध्यात्मविषयकध्वनीचित्र-चकत्या इत्यादी अध्यात्माला पूरक अशा वस्तूंचे वाण द्यायला हवे. सात्त्विक वाण दिल्यामुळे ईश्वराशी अनुसंधान साधले जाऊन दोन्ही व्यक्तींना चैतन्य मिळते. त्यामुळे ईश्वरीकृपा होते.

मडक्यांप्रती (सुगड) कतज्ञता व्यक्त करण्याचा सण – सूर्यदेवाने जास्तीतजास्त उष्णता देऊन पृथ्वीवरील बर्फ वितळवण्यासाठी साधना (तपश्चर्या) चालू केली. त्या वेळी रथाला असलेल्या घोड्यांना सूर्यदेवाची उष्णता सहन न झाल्याने त्यांना तहान लागली. तेव्हा सूर्यदेवाने मातीच्या मडक्यातून पृथ्वीवरचे पाणी खेचून (विहिरीतून घड्याने पाणी काढतात तसे) घोड्यांना प्यायला दिले; म्हणून संक्रांतीच्या वेळी घोड्यांना पाणी पाजलेल्या मडक्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मातीची मडकी पूजण्याची प्रथा चालू झाली. रथसप्तमीच्या दिवसापर्यंत सुवासिनी हळदीकुंकवाच्या निमित्ताने या पूजलेल्या मडक्यांचे वाण एकमेकींना भेट म्हणून देतात. मातीचे मडके म्हणजेच सुगड. सुगडांना हळदी-कुंकवाची बोटे लावून दोरा गुंडाळतात. सुगडांमध्ये गाजर, बोरे, उसाची पेरे (कांड्या), शेंगा, कापूस, हरभरे, तीळगूळ, हळदीकुंकू इत्यादी वस्तू भरून ते दिले जाते.

पतंग उडवू नका ! – या काळात बऱ्याच ठिकाणी पतंग उडविण्याची प्रथा पडली आहे परंतु हे चुकीचे आहे.केवळ हौस ,मौज म्हणून कोणतीही कृती करण्यापेक्षा आपल्याला लाभ होईल अशी कृती करणे अधिक संयुक्तिक ठरते.सध्या राष्ट्र मोठ्या संकटाना तोंड देत आहे असे असतांना केवळ मनोरंजनासाठी पतंग उडवणे म्हणजे ‘रोम जळत असतांना नीरो फिडल वाजवत होता’, त्याप्रमाणे आहे. पतंग उडवण्याचा वेळ राष्ट्राच्या विकासासाठी वापरला, तर राष्ट्र लवकर प्रगतीपथावर जाऊ शकेल. त्याचप्रमाणे या काळात साधना, राष्ट्र आणि धर्मकार्य यांसाठी प्रयत्न केल्यास स्वतःसह समाजाचेही कल्याण होईल.’

संदर्भ – सनातन-निर्मित ग्रंथ ‘सण, धार्मिक उत्सव आणि व्रते’
संकलन- श्री. दत्तात्रेय वाघूळदे, सनातन संस्था, संपर्क- 9284027180

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!