Home करियर मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काळानुरूप प्रयत्नांची गरज – कुलगुरू डॉ. उद्धव भोसले -NNL

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी काळानुरूप प्रयत्नांची गरज – कुलगुरू डॉ. उद्धव भोसले -NNL

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे उद्घाटन

नांदेड| मराठी भाषेमध्ये सर्व विद्याशाखांमधील अद्ययावत ज्ञान उपलब्ध झाले पाहिजे. मराठी भाषेला ज्ञानभाषा म्हणून समाजाने स्वीकारले पाहिजे, तिच्या संवर्धनासाठी काळानुरूप प्रयत्नांची गरज आहे. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या उद्घाटन प्रसंगी केले.

विद्यापीठातील भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुल, ज्ञान स्रोत केंद्र आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याची सुरुवात ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करून कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एल. एम. वाघमारे, मानव्यविद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे यांची प्रमुख उपस्थिती होती.

ज्ञान स्रोत केंद्रात आयोजित ‘अभिजात मराठी ग्रंथांच्या प्रदर्शनाची’ कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी प्रारंभी पाहणी केली. मराठी भाषेतील अभिजात ग्रंथांसमवेत संतवाङ्मय, लोकसाहित्य, शब्दकोश, परिभाषाकोश, विश्वकोश प्रदर्शनात ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल डॉ. केशव सखाराम देशमुख, डॉ. पृथ्वीराज तौर आणि डॉ. पी. विठ्ठल यांचा यावेळी कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत विद्यापीठात ऑनलाईन पद्धतीने दि. २८ जानेवारीपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त संख्येने रसिकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. शैलजा वाडीकर यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. राजेश काळे यांनी केले. तर ज्ञान स्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदिश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक व आभार व्यक्त केले. कार्यक्रमाला डॉ. दिलीप चव्हाण, डॉ. रमेश ढगे, डॉ. योगिनी सातारकर, डॉ. वैजनाथ अनमुलवाड, डॉ. नीना गोगटे, प्रा. जीशान अली, जी. ए्न. लाटकर, डॉ. अरुण हंबर्डे, सायलू नरोड, संदिप डहाळे यांच्यासह ग्रंथालय कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

स्वारातीम’ विद्यापीठातर्फे एनपीटीईएल जागरुकता कार्यशाळेचे आयोजन
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील गणितीयशास्त्रे संकुल, स्वयम व मूक केंद्र, पीएसजी महाविद्यालय कोईम्बतूर आणि एनपीटीएल, आयआयटी मद्रास यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १८ जानेवारी २०२२ रोजी राष्ट्रीय स्तरावरील एक दिवसीय ‘NPTEL Awareness’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले आहे.

सदर कार्यशाळेत स्वयम- एनपीटीईएल ऑनलाईन कोर्सेसची माहिती, त्यासाठी नाव नोंदणी कशी करावी, अशा ऑनलाईन कोर्सेसची उपयुक्तता तसेच नोकरीसाठी सदरील ऑनलाईन कोर्सेसची उपयुक्तता, श्रेयांक हस्तांतरण इत्यादी बाबीवर एनपीटीईएल आयआयटी मद्रास येथील साधन व्यक्ती त्यांचे विचार मांडतील. जानेवारी ते एप्रिल २०२२ या सत्रासाठी स्वयम- एनपीटीईएल अंतर्गत सुमारे ८०० ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध असून त्यामध्ये विज्ञान, अभियांत्रिकी, कला, वाणिज्य, सामाजिकशास्त्रे इत्यादी शाखांमधील नानाविध कोर्सेसचा समावेश आहे.

सदर कार्यशाळेत सहभाग नोंदवण्यासाठी कुठल्याही प्रकारचे नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही. तसेच कार्यशाळेत सहभाग नोंदविण्यासाठी कुठल्याही पूर्व नोंदणीची आवश्यकता असणार नाही. सदरील कार्यशाळा युट्युब लाईव्ह द्वारे आयोजित केलेली असून दि. १८ जानेवारी २०२२ रोजी स. १०:०० वा. पासून या कार्यशाळेला सुरुवात होणार आहे. या कार्यशाळेच्या अधिक माहितीसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी व सदर कार्यशाळेत अधिकाधिक शिक्षक व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!