Home व्हिडीओ हिमायतनगरच्या एका गुटखा माफियासह वाहन चालकावर भोकर पोलिसात कार्यवाही; ६० लाखाचा मुद्देमाल जप्त -NNL

हिमायतनगरच्या एका गुटखा माफियासह वाहन चालकावर भोकर पोलिसात कार्यवाही; ६० लाखाचा मुद्देमाल जप्त -NNL

हिमायतनगरमधील चौपाटीतल्या गुटखा माफियांवर कधी कार्यवाही होणार..?

हिमायतनगर, अनिल मादसवार| हरियाणा राजस्थानच्या वाहनातून हिमायतनगर शहराकडे येणाऱ्या गुटख्याने भरलेला दहा चाकी कंटेनरसह भोकर पोलिसांनी काल रामप्रहरी जप्त केला. त्यात एकूण ६० लक्ष ९२ हजार ८०० चा मुद्देमाल जप्त केला असून, हिमायतनगर येथील गुटखा माफियासह वाहनचालका विरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. गुटख्याचे हे सर्व धंदे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आशिर्वादानेच सुरु असून, यास स्थानिक पोलिसांचीही साथ मिळत असल्याने हिमायतनगर शहर हे होलसेल गुटखा विक्रीचे केंद्रबिंदू बनले आहे. याकडे पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर हे तेलंगणा राज्याला व विदर्भाला लागून आहे. त्यामुळे दोन्ही राज्याचे मध्यभागाचे शहर असल्याने येथे तेलंगणा- कर्नाटक राज्याच्या सीमेवरून – नांदेडमार्गे कधी शिवानी, म्हैस मार्गे कंटेनर, ट्रक, टेम्पच्या माध्यमातून गुटख्याची वाहतूक केली जाते हे सर्वश्रुत आहे. हा सर्व प्रकार अन्न – औषध, पोलीस प्रशासनातील एलसीबीचे अधिकारी व त्यांच्या वरिष्ठाना तसेच ज्या भागातून हे वाहन येते त्या-त्या भागातील उपविभागीय अधिकारी, पोलीस अधिकारी याना सांगूनच चालविण्यात येतो अशी खात्रीशीर माहिती आहे.

दि.२७ ऑगस्ट रोजी रामप्रहरी ४ वाजेच्या सुमारास गुटख्याने भरून येणार कंटेनर क्रमांक HR 55U -7054 हा भोकर मार्गे – हिमायतनगरकडे जाण्याच्या तयारीत होता. याची गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळल्यावरून भोकरचे पोलीस निरीक्षक वीकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनिल कांबळे यांनी गुटखा भरून येणारे हे कंटेनर थांबवून विचारपूस केली. आणि संशय आल्याने कंटेनरची पाहणी केली असता यामध्ये भरगच्च भरून ठेवलेले ११९ पांढऱ्या रंगाची पोती त्यात ३४ लक्ष २७ हजार २०० रुपयांचा गुटखा होता. आणि लालसर रंगाचे २३ पोत्यात त्यात १ लक्ष ६५ हजार ६०० रुपयाचा गुटखा होता. दोन्ही नमुन्याचे एकेक पोती पंचासमक्ष फोडून पाहून यात राजनिवास गुटखा असल्याची खात्री केली.तर कंटेनर किंमत २५ लक्ष असा एकूण ६० लक्ष ९२ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून कंटेनर चालक शाहिद इसाक रा.घर क्रमांक ५१ पाठकोरी, ता.फैजपूर, जी.मेवाड, राजस्थान व हिमायतनगर येथील गुटखा माफिया रिजवान जी.नांदेड या दोघांवर अण्णा व औषध सुरक्षा कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या धडाकेबाज कार्यवाहीची गुटखा माफियांचे धाबे दणाणले असले तरी हिमायतनगर शहरात राजरोसपणे गुटखा विक्रीचा गोरखधंदा सुरूच आहे.

शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची नंबर दोनच्या धंद्यातून हिमायतनगर या गुटख्याच्या होलसेल ठिकाणाहून दर १५ दिवसांनी कोट्यवधींचा माल उतरविण्यात येत असून, याची उलाढाल शहरातून विदर्भात होलसेल आणि शहरात व तालुक्यात रिटेल पद्धतीने केली जात आहे. मागील कोरोना काळातही सर्व दुकाने बंद असताना देखील हा गुटखाचा गोरखधंदा राजरोपणे चालविण्यात येत होता, मात्र पोलिसांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होते. मागील काही महिन्यांपूर्वी हिमायतनगर शहरातील सिरजनी रस्त्यावर असलेल्या याचा रिजवान नामक होलसेल गुटखा विक्रेत्याचा माल उतरवीत असताना त्यांच्याच घराजवळ एलसीबीच्या पथकाने पकडून ४२ लाखाचा गुटख्यासह ट्रक जप्त केलं होता. मात्र शहरातील चौपाटी भागात राजरोसपणे गुटख्याची विक्री करणाऱ्या त्या विक्रेत्यांवर पोलिसांनी कार्यवाही केली नाही.

या बाबत अनेकदा वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही स्थानिक पोलिसांनी या गुटख्याच्या विक्रेत्याकडून आपली मूठ झाकल्यामुळं कि काय..? अद्याप कोणतीच कार्यवाही झाली नाही. परंत्तू चौपाटीतील त्या होलसेल गुटखा विक्रेत्यांवर विदर्भ हद्दीत कार्यवाही करण्यात आली. मात्र हिमायतनगर पोलिसांनी याकडे कानाडोळा केल्याचे स्पष्ट जाणवत आहे. त्यानंतर काल पुन्हा रिजवान नावाच्या गुटखा विक्रेत्याचाच माल भोकर पोलिसांनी पकडला आहे. आता हिमायतनगरात चालणाऱ्या चौपाटी भागातील गुटखा माफियांवर कधी कार्यवाही होणार आणि हे शहरात सुरु असलेले जुगार, गुटखा, मटक्यासह इतर अवैद्य धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विपीन आणि पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे हे लक्ष देतील काय याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!