Home व्हिडीओ हिमायतनगर विसर्जन मार्गावरील खड्ड्यात अल्पसा मुरूम; शहरातील घाणीमुळे भाविक नाराज -NNL

हिमायतनगर विसर्जन मार्गावरील खड्ड्यात अल्पसा मुरूम; शहरातील घाणीमुळे भाविक नाराज -NNL

यदाकदाचित अनुचित घटना घडल्यास नगरपंचायतीचे अधिकारी जबाबदार..!

हिमायतनगर, अनिल मादसवार| अनंत चतुर्दशी रोजी होत असलेल्या गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर नगरपंचायतीच्या नियोजनाचा अभाव दिसून आला आहे. विसर्जनापूर्वी शहरातील मिरवणुकीचे रस्ते खड्डेमुक्त करण्यात बनवाबनवी झाल्याने नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

हिमायतनगर नगरपंचायतीवर नियुक्त झालेल्या प्रशासक व प्रभारी मुख्याधिकारी यांचा नाकर्तेपणा शहरातील स्वच्छतेसह रस्त्याच्या डागडुजी व इतर नागरी सुविधांच्या उद्भवणाऱ्या समस्येवरून संबंधित याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याने बोलले जात आहे. त्यामुळे विसर्जन मार्गावरील खड्डेमय अडथळ्यामुळे श्रीच्या मूर्तीला धक्का लागू नये म्हणून रस्त्यावरील खड्ड्याची चांगली दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र थातुर माथूर मुरूम टाकून निधी लाटण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप जेष्ठ शिवसैनिक विठ्ठलभाऊ ठाकरे यांनी केला. तर विसर्जन स्थळी सुरक्षेच्या दृष्टीने जीवरक्षण तैनात न करता केवळ २०० रुपये रोजचे दोन माणसे उभे करून नगरपंचायत प्रशासनाने आपला नाकर्तेपणा झाकण्याचा प्रयत्न केला असून, यदाकदाचित कोणतीही दुर्घटना घडली तर यास नपचे प्रशासक व प्रभारी अधिकारी जबाबदार राहतील असा आरोप भाजप युवा मोर्च्याचे तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलताना केला आहे.

एवढेच नाहीतर विसर्जन मिरवणुकीच्या मुख्य रत्स्यावर कचऱ्याच्या पसरलेले घाणीचे साम्राज दूर करणे क्रमप्राप्त असताना ठेकेदाराची स्वच्छता करणारी टीम संपावर गेल्याने शहराची आज स्वच्छता झालीच नाही. त्यामुळे ठेकदारासह अधिकारी आपले उखळ पांढरे करून घेण्यात मग्न असल्याचे यावरून दिसत आहे. दरम्यान विसर्जन स्थळाच्या ठिकाणी सकाळपासून प्रशासक आणि प्रभारी मुख्याधिकाऱ्यानी भेट दिली नव्हती. त्यामुळे येथे उपस्थित असलेल्या नपाच्या संबंधितांना नपतर्फे काय उपाययोजना केल्या याबाबत माहिती विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया देणे टाळल्यामुळे सणासुदीच्या दिवशी नगरपंचायतीचा गलथान कारभार समोर आला आहे. वृत्त लिहीपर्यंत एकही जबाबदार अधिकाऱ्यांनी भेट दिली नव्हती, मात्र पोलीस प्रशासनाने गणेश विसर्जन दरम्यान कोणतीही अनुचित घटना होऊ नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त लावल्याचे दिसून आले आहे.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!