Home खास न्यूज प्रा. अशोकुमार दवणे यांचे कार्य ऐतिहासिक -कुलगुरु डॉ. उध्दव भोसले -NNL

प्रा. अशोकुमार दवणे यांचे कार्य ऐतिहासिक -कुलगुरु डॉ. उध्दव भोसले -NNL

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे थाटात प्रकाशन

by NNL ऑनलाईन

नांदेड| कवी प्रा. अशोकुमार दवणे यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचा गौरव करणार्‍या २०२१ कवींच्या तेवढ्याच कविता संकलीत स्वरूपात प्रकाशित करून मोठे ऐतिहासिक काम केले आहे. त्यांच्या कामाची निश्चितच दखल घेतली जाईल, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उध्दव भोसले यांनी प्रा. दवणे यांनी संपादित केलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन करतांना केले. कुलगुरूंच्या दालनात त्यांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाकाव्यग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

२० ऑक्टोबर रोजी या महामानव महाकाव्यग्रंथाचे ३६ जिल्ह्यामधे ११ विद्यापीठाचे कुलगुरू आणि २५ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते एकाच दिवशी प्रकाशन करण्यात आले. असा हा अनोखा प्रकाशन सोहळा भारतात प्रथमच घडून आला आहे हे विशेष. सुरूवातीला कुलगुरूंनी पुष्पगुच्छ देऊन संपादक कवी अशोककुमार दवणे यांचे स्वागत केले. मी गेल्या चाळीस वर्षांपासून साहित्य चळवळीत असून तीन पिढ्यातील २०२१ कवींच्या २०२१ कवितांचा हा भारतातील बाबासाहेबांवर लिहिलेल्या कवितांचा सर्वात मोठा महाकाव्यग्रंथ संपादित करून प्रकाशित केल्याचा मला मोठा आनंद आहे.

बाबासाहेबांनी केलेल्या कार्याचा काव्यरुपी गौरव करण्याची संधी यानिमित्ताने मला मिळाली असे दवणे यांनी मनोगतात सांगितले. सुप्रसिद्ध कवी डॉ. जगदीश कदम यांनी कवी दवणे यांनी अनेक वर्षांपासून बाबासाहेबांवरील कवितांचे संकलन करण्याचे काम सुरू केले होते. या महामानव महाकाव्यग्रंथाच्या माध्यमातून मराठीतील नव्याजुन्या कवींच्या बाबासाहेबांवरील कविता वाचण्याची संधी वाचक, अभ्यासकांना मिळणार असून जागतिक पातळीवर या काव्यग्रंथाची निश्चितच दखल घेतली जाईल असे सांगितले. ज्येष्ठ कवी रविचंद्र हडसनकर यांनी दवणे यांच्या कार्याचे कौतुक केले.

मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य शिवा कांबळे यांनी प्रा. अशोककुमार दवणे यांनी मराठीतील २०२१ कवींना एकत्र आणण्याचे न भूतो न भविष्यती असे काम केले असून त्यांचे काम अभूतपूर्व असल्याचे सांगितले. कवी अनुरत्न वाघमारे यांनी आभार मानले. याप्रसंगी कवी के.बी. मदने, उत्तम सोनकांबळे, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम, डॉ. सोनकांबळे हे उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचण्याचे विसरलात

error: Content is protected !!