मराठी भाषा विकासाचे प्राथमिक स्तरावरील प्रयत्न

मराठी आमुची मायबोली जरी आज ती अभिजात भाषा नसली तरी अमृतातही पैजा जिंकणारी आहे. मराठी बोलण्याची गोडी ज्या मराठी भाषकांना आहे ते स्वतःला भाग्यवान समजतात. मराठी या भाषेवर अतोनात प्रेम करणार्‍या मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानपीठ विजेते विष्णू वामन शिरवाडकर म्हणजचे कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने मराठी भाषा दिन, जागतिक मराठी भाषा दिवस किंवा भाषा गौरव दिन या अनेक नावांनी साजरा केला जातो. हा दिवस म्हणजे २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रजांचे मराठी भाषेतील योगदान अतुलनीय असून भविष्यात येणार्‍या पिढीने मराठीच्या संवर्धनाचा वारसा पुढे चालवावा ह्या अपेक्षेने हा मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात प्रघात सुरु झालेला आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाकरीता विविध स्तरांवर अनेकविध प्रयत्न सुरु असून मराठी मातीचा ललाटास टिळा लावून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी मराठी मातीचे सुपूत्र प्राणपणाने झटत आहेत.

आयसीएसई बोर्डाच्या भाषा विकल्पाच्या नव्या धोरणामुळे शाळांमधून मराठी आणि हिंदी भाषासह सर्वच प्रादेशिक भाषा हद्दपार होण्याचं संकट निर्माण झालेलं आहे. यातूनच मराठी लर्निंग ऍक्टची मागणी करण्यात आली. मराठी भाषा महाराष्ट्रात अनिवार्य करण्यात यावी कोणताही विकल्प सोडू नये अशी भूमिका मराठी प्रेमींनी घेतलेली आहे. म्हणून ज्या ठिकाणी मराठी ही द्वितीय भाषा किंवा वैकल्पिक मानली जाते तिथे अनिवार्य करण्यात आलेली आहे. मराठी भाषा शिकविणार्‍या शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी तथा सर्वच मराठी भाषकांनी अस्खलीतपणे मराठीतच बोलावे तसेच इतरांनाही मराठीतच बोलण्याचा आग्रह धरावा असे अपेक्षीत आहे. लहानपणापासूनच प्राथमिक व उच्च प्राथमिक स्तरावर काही प्रयत्न चालू आहेत ते वाखाणण्याजोगे आहेत.

प्राथमिक स्तरावरील श्रवण, भाषण, वाचन, लेखन, भाषण-संभाषण या भाषिक कौशल्यानंतर समजपूर्वक ऐकणे, वाचणे व लिहिणे अपेक्षित आहे. लेखन शिकल्यानंतर विद्यार्थी एखाद्या साहित्य प्रकाराशी भावात्मकरित्या जोडल्या जावा, एखादे नवीन पुस्तक किंवा नवीन साहित्य प्रकार समोर आल्यावर तो वाचण्याची उत्सुकता निर्माण व्हायला हवी यासाठी भाषिक उपक्रमांची आखणी करण्यात येते. उच्च प्राथमिक स्तरावर विविध स्थितींच्या संदर्भात स्वतःला लिखित स्वरुपात अभिव्यक्त होता येणे, त्याचे दृढीकरण घडून येणे हा लेखनाचा उद्देश आहे. विद्यार्थी भिन्न प्रकारचे साहित्य प्रकार वाचतील, त्यातून प्रतिबिंबीत होणारे विचार, त्यातील पूर्वग्रह, महत्त्वपूर्ण भूमिका यांचा परिचय होणे आवश्यक आहे. यासाठी भाषेतील सौंदर्यस्थळे, विविध घटक आदींचे सोप्या भाषेत विश्‍लेषण करणे, व्याख्या तयार करणे, अर्थ लावणे व आत्मविश्‍वासाने मांडणी करणे याबाबतही प्रयत्न सुरु आहेत. कोणतेही साहित्य ऐकून किंवा वाचून त्यावर सखोल चर्चा करणे आपली प्रतिक्रिया व्यक्त करणे, प्रश्‍न, टिप्पणी लिहून अभिव्यक्त होता यावे यासाठीही प्रयत्न केले जात आहेत. एकूणच रचनात्मक आणि सृजनात्मक पद्धतीने मराठी भाषेचे प्रकटीकरण मुलांकडून घडून यावे हे शेवटपर्यंत गृहीत धरण्यात आले आहे.

मराठी भाषेला एक गौरवशाली इतिहास आहे. ही सांस्कृतिक परंपरा कायम व टिकवून ठेवायची असेल तर शाळा-शाळांमधून असे प्रयत्न झाले पाहिजेत. पाठ्यक्रमाकडून ज्या अपेक्षा व्यक्त करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये जिज्ञासा निर्माण होणे, जाणून घेणे अथवा समजून घेणे, स्वतःला अभिव्यक्त करणे, व्याख्या करणे, अनुभवांचे कथन करणे, वर्णन करणे, आपले मत व्यक्त करणे, विविध साहित्य कृतींचा आनंद घेता येणे, दैनंदिन जीवनात मराठीचा अनिवार्य वापर करणे, मराठी साहित्याच्या विविध सर्जनशील विचार समजून घेणे, तर्क मांडणे, भाषेतील बारकावे, भाषेची लय समजून घेणे, भाषेची रचना ओळखणे आणि विश्‍लेषण करणे, शेवटी रचनात्मक सृजनशील मांडणी करणे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्राथमिक शाळेतही भाषेला सौंदर्य प्राप्त करुन देण्याची पहिली पायरी तयार करण्यात आली आहे.

मराठी भाषा शिकण्याच्या अध्ययन निष्पत्तीकरीता जी उद्दिष्टे निश्‍चित करण्यात आलेली आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तीक अथवा गटात काही उपक्रम घेऊन त्यांना क्रियाशील राहण्याची संधी आणि प्रोत्साहन देण्यात येते. मराठी भाषेच्या सकारात्मक विकासासाठी काही अध्ययन अनुभव दिले जातात. त्यामुळे विविध विषयांवर आधारित विविध प्रकारचे साहित्य वाचून मुले चर्चा करतात. मराठी भाषेतील विविध प्रकारचे साहित्य, मजकूर, वृत्तपत्रातील, मासिके, कथा, इंटरनेटवर प्रसिद्ध होणारे साहित्य समजपूर्वक वाचू शकतात, तसेच त्याबद्दल आपली आवड-नावड, मते निष्कर्ष सांगू शकतात. तसेच एखादे साहित्य वाचून त्यातील सामाजिक मूल्यांविषयी चर्चा, विविध संवेदनशील मुद्यांविषयी शिक्षक, मित्र वा आपले कुटुंबिय यांच्यात चर्चा घडून येते ती भाषा विकासात पोषकच असते. मनात तयार होणारे प्रश्‍न, त्याबद्दलचे अधिक चिंतन यांचेही चारचौघात अभिव्यक्त होणे आवश्यक ठरते.

मराठी भाषा दिनाच्या गौरवासाठी विविध मराठीप्रेमी मंडळे अनेक कार्यक्रम आयोजित करतात. शहरातील दुकानांना मराठी पाट्या लावून, मराठी बोलणार्‍यांनाच रिक्षा चालविण्याचे परवाने देऊन, शासकीय कार्यालयाचे कामकाज अथवा संभाषण हे मराठीतच व्हायला पाहिजे अशी अपेक्षा धरुन केवळ व्यावहारिक मराठींचा प्रश्‍न तोही काही अंशी सुटेल. गरज म्हणून किंवा अनिवार्यता म्हणून मराठी बोलणे आणि दैनंदिन जीवनात वापरावी लागेल. आपण अनेक शब्द इंग्रजी वापरतो. ते इतके रुढ झालेले आहेत की मराठी पर्यायी शब्दांची पण आवश्यकता वाटत नाही. त्यासाठी आपल्या मराठी मातृभाषेबद्दल वाटणारी आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम जे काही आहे ते लहानपणापासूनच म्हणजे प्राथमिक शाळा स्तरांपासूनच मुलांमध्ये निर्माण होणे गरजेचे आहे. इतर भाषिक ज्याप्रमाणे आपल्या मातृभाषेशिवाय इतर भाषांना दुय्यम समजतात व जितके प्रेम आपल्या मातृभाषेवर करतात तसे मराठी माणूस काही करत नाही. त्याला हिंदी बोलण्यात पुढारलेपणा आणि इंग्रजी शब्द अधुनमधून वापरण्यात मोठेपणा वाटतो. इंग्रजाळलेले मराठी भाषिक तर सर्वात पुढे आहेत. त्यांना मराठी भाषा अस्मितेशी काहीच देणे-घेणे नाही.

मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून विविध उपक्रम राबविले जातात. मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यातही विविध स्पर्धा, काव्यवाचन, लेखन, भाषण-संभाषणाचे कार्यक्रम घेण्यात येतात. परंतु हे काही कालमर्यादीत असा कार्यक्रम नाही. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. मराठीत अनेक बोलीभाषांचा अंतर्भाव आहे. विशिष्ट लकबी आणि लयींचाही संदर्भ आहे. चालबद्ध पद्धतीने मराठी भाषा बोलली जाते. म्हणून दहा कोसांवर मराठी भाषा बदलते हा निष्कर्ष काढण्यात आला. विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेतच अभिव्यक्त होण्याची संधी देण्यात यावी अशा सूचना करण्यात आल्या. बोलीभाषेने त्यातील विविध अर्थाच्या छटा असलेल्या शब्दांनी मराठी समृद्ध होते असेही काहींचा अंदाज आहे. बोलीभाषा टिकली तरच मराठी टिकेल असे म्हणून एका बोलीभाषेतील भावार्थ दुसर्‍या बोलीभाषेतील वापरकर्त्याला काही केल्या समजत नसेल तर हा खटाटोप कशासाठी? प्राथमिक स्तरावर विद्यार्थ्यांच्या भावविश्‍वाशी समरस होऊनच भाषा विकासाचे तंत्र आत्मसात करण्याची संधी दिली जाते.

जगभरात मराठी बोलणार्‍यांसाठी भाषा हवी तशी न वळविता एकमान्य आणि जगन्याय अशा पद्धतीने भाषेची संरचना आवश्यक आहे. बोलीभाषेतील शब्द प्रामुख्याने पुढे आणता येतील परंतु ते वापरात अधिक असले पाहिजेत. एका प्रमाणबद्ध भाषेचीच आपल्याला आवश्यकता आहे. भाषा विकासासाठी अधिकाधिक प्रयत्नांची गरज आपल्याला भासणार आहे. आज मराठी ही आमची राजभाषा असली तरी ती प्रशासकीय कामकाजापुरती मर्यादित राहणं अपेक्षित नाही. इंग्रजी शाळांचे भरमसाठ पेव फुटले असताना इंग्रजी भाषेसोबतच मराठी भाषेचे ज्ञान मुलांना असणे आवश्यक आहे. मुलांना मराठी शाळेतच पाठविण्यासाठी पालकांचा अट्टाहास असला पाहिजे तसाच तो मराठी भाषा अनिवार्य असण्याबाबत ही असायला हवा. मुलांनी आपले अनुकरण करावे ह्यासाठी मराठी भाषेतीलच पुस्तके आपण वाचली पाहिजेत. मुलांशी चर्चा केली पाहिजे. महाराष्ट्राची मराठी मातीशी असलेली सांस्कृतिक नाळ तुटता कामा नये. मराठीला निश्‍चितच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, ह्यात शंका नाही. सोशल मिडियातूनही चांगल्या प्रकारचे मराठी लेखनास प्रोत्साहन द्यायला हवे. शुद्धलेखनाच्या भाषा संवर्धन विषयक कार्यशाळा आयोजित करणे आवश्यक आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची बाब केंद्र सरकारने विचारात घेतलेली आहे. हे मराठी भाषा शिकविणार्‍या शिक्षकांनी लक्षात घ्यायला हवे. मराठीला सद्यःस्थितीत पुढे नेण्याची जबाबदारी आता खास करुन शिक्षकांचीच आहे. मराठी अस्मिता जपण्यासाठी शिक्षक-प्राध्यापकांची- साहित्यिकांची एकसंध चळवळ पुढे यायला हवी. राजकीय लोकांची इच्छाशक्ती व केजी ते पीजी पर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा हीच मराठीला न्याय मिळवून देईल. तेंव्हा मराठी भाषा बोलण्याचे, अवगत करण्याचे, ऐकण्याचे, मराठीला वंदन करण्याचे भाग्य आम्हास खर्‍या अर्थाने लाभेल याच अर्थाने सुरेश भटांच्या काही ओळी मराठी भाषेचे जागतिक श्रेष्ठत्व सिद्ध करतात-
लाभले आम्हांस भाग्य, बोलतो मराठी|
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी॥
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी|
एवढ्या जगात माय मानतो मराठी॥

  • गंगाधर ढवळे, नांदेड, मो. ९८९०२४७९५३

You may also like