मानवी जीवनातील विज्ञानवादी शिक्षणाचे व्यवस्थापन

पिढ्यान्‌पिढ्या अज्ञान, अंधश्रद्धा यांच्या दलदलीत मानवी जीवन गेल्यामुळे देश अनेकवर्षे गुलामगिरीत राहिला. जेंव्हापासून भारताने विज्ञानाची कास धरली तेंव्हापासून प्रगतीच्या वाटा तयार झाल्या. विज्ञानवादी दृष्टीकोन अवलंबिल्यामुळे व्यक्ती स्वतःची प्रगती करुन घेऊ शकतो. पर्यायाने समाज विकसीत होतो आणि राष्ट्रीय प्रगतीत वैकासिक समाजाचा मोठा वाटा असतो. प्रगतशील राष्ट्रातील लोकांना गरीबी, अज्ञान, अंधश्रद्धा आदींच्या दुष्टचक्रातून मुक्तता मिळवून देणारी विज्ञान ही मानवाला मिळालेली अलभ्यलाभ देणगी आहे. जगभरात नवनवे संशोधन होत असून अत्यंत मोठ्या प्रमाणावर ज्ञानाचा स्फोट होताना दिसून येत आहे. त्यामुळे दैनंदिन जीवन जगत असताना प्रचंड वेगाने होत असलेल्या बदलांना लोकांना सामोरे जावे लागत आहे. इतके असताना आजही देशातील विविध जातीसमूह पारंपारिक पद्धतीने जीवन जगताना दिसतात. त्याच त्याच भाकडकथांत रमताना दिसतात, ही देशाचीच शोकांतिका नव्हे तर जगाच्या नकाशावर भारत हा मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा पाळणारा देश आहे अशी त्याची ओळख आहे.

विज्ञानात भारताने अमुलाग्र प्रगती केली आहे. शेती, खगोल, अर्थ, शिक्षण अशा विविध क्षेत्रात गगन भरारी घेतली आहे. हे अंधश्रद्धा पाळल्यामुळे नव्हे तर वैज्ञानिक दृष्टीकोन आणि वैज्ञानिक विचारपद्धती अंगीकारल्यामुळे होय. चिकित्सा हा विज्ञानवादी जीवनपद्धतीचा अविभाज्य भाग आहे. या देशात वर्षानुवर्षे कर्मकांड, रुढी, परंपरा, जूनाट तथा बुरसटलेल्या चालीरिती जशा चालत आलेल्या आहेत तशाच त्या पिढी दर पिढी वारसापद्धतीने आल्या. समाज मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या भाकडकथांत रमला. त्याने कधीही कोणत्या गोष्टीची चिकित्सा केली नाही. धर्माची चिकित्सा करायला तर पूर्णपणे बंदी होती. धार्मिक तत्त्वनितींनी समाजाला विज्ञानवादी होण्यास अत्यंत कडक निर्बंध घातले होते. येणार्‍या नव्या विचारांना व शोधंना स्विकारण्याची धार्मिक मूलतत्त्ववाद्यांची तयारीच नव्हती त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोन समाजात रुजायला नव्या क्रांतीची पहाट उगवावी लागली.

शालेय जीवनापासून विज्ञान हा विषय ठेवून त्यांच्यात विज्ञानवादी दृष्टीकोन निर्माण व्हावा हा उद्देश असतो. गुप्तधन, जादूटोणा, छू-मंतर, हातचालाखी, काळी जादू, नजरबंदी आदी प्रकार अंधश्रद्धेची अपत्य आहेत तर अशा सगळ्या अंधारलेल्या कुप्रथांनी मजबूत अशी अंधश्रद्धा निर्माण होते. त्याचे कारण आहे केवळ दारिद्य्र आणि अज्ञान. परंतु उच्चविद्या विभूषीत तरुण जर धार्मिकतेकडे झुकत असतील आणि नागा साधूंची दीक्षा घेऊन आपले करिअर बरबाद करीत असतील तर इथे शिक्षणाचा घनघोर पराभव झाला आहे, असे म्हणता येईल. विज्ञान शिक असताना अनेक नव्या गोष्टींची माहिती होते. नवे काहीतरी शिकायला मिळते. शिकणार्‍याला जिज्ञासू वृत्तीने नवे आणि खरे ज्ञान मिळविण्यात आनंद वाटतो. त्याच्या कार्यकलापात रंजकता निर्माण निर्माण होते. त्यात तो रस घेऊ लागतो. तो संशोधन करु लागतो आणि त्यातूनच तो नव्या शोधाचा शोध लावतो. जगभरात घडणार्‍या घटनांविषयी तर्कनिष्ठ, विवेकबुद्धीने विचार करता आला पाहिजे व त्या आधारावर आत्मविश्‍वासाने आणि आनंदाने जीवन जगता यावे हे खरे विज्ञान शिक्षणाचे उद्दिष्ट आहे. सामाजिक जाणिवा, पर्यावरण संवर्धन विषयक जागरुकता यांचा विकास व्हावा, तसेच तंत्रज्ञान वापरण्यात येणारी सहजता या सर्वच बाबी विज्ञान शिक्षणातून अपेक्षित आहेत. मानवी प्रतिष्ठा, अधिकार, लैंगिक समानता तसेच प्रामाणिकपणा, सचोटी, सहकार्य आणि जीवनाविषयी आत्मीयता याबद्दल आदर निर्माण होतो.

विज्ञानात चिकित्सा पद्धतीला जसे महत्त्व असते तसे तर्कबुद्धी, तर्कनिष्ठेला महत्त्व असते. सद्सदविवेकबुद्धी जागृत ठेऊन तर्कसंगतीनुसार अखेरच्या प्रायोगिक सिद्धांपर्यंत पोहोचता येते. तर्कशुद्धता ही विज्ञानविषयक उपक्रमांत महत्त्वाचीच असते. हे कौशल्य आत्मसात होण्यासाठी विज्ञान विषयाच्या अध्ययन टप्प्यावर स्वतःच्या व्यक्तीमत्त्वाचा व वैचारिक पातळीचा कस लागतो. एखाद्या माहितीचे सार संकलन व अर्थ विश्‍लेषण करणे जमले पाहिजे. बारकाईने विचार करुन आपल्याजवळ असलेल्या ज्ञानाच्या आधारावर मांडलेले चिकित्सात्मक सिद्धांत हे नेमके असतात. विज्ञानवादी वैचारिक घुसळणीचे अर्करुप असतात. ते नितीनिरपेक्ष, विकसनशील व सर्जनशीलही असतात. चिकित्सेचे लावण्य विज्ञान सौंदर्याची देणच आहे.

निरीक्षण ही विज्ञान शिकण्याची पहिली पायरी आहे. निरीक्षणातून मिळविलेले ज्ञान हे कच्च्या स्वरुपाचे असते. त्याच्या नोंदी महत्त्वपूर्ण असतात. त्या एकात्मिक नसतात. त्या वेगवेगळ्या अंगांनी मांडलेल्या असतात. त्यातून निघणारे निष्कर्ष ही गृहितकाच्या पद्धतीचेच असतात. मिळालेल्या ज्ञानाचे सारणीकरण, वर्गीकरण, तुलनात्मक पद्धती, चिंतन, मनन व इतर प्रायोगिक पद्धतीनुसार निश्‍चिंत अनुमान काढता येते. त्यामुळे निरीक्षण क्षमता अवगत करणे हे ज्ञानाचे कौशल्य आहे. निरीक्षणानंतर मनात अनेक प्रश्‍न निर्माण होतात. जितके अधिक प्रश्‍न निर्माण होतात तितके सिद्धांत स्वरुप मांडण्याच्या जवळ जाण्यास मदतच होते. प्रश्‍नांनी भंडावून सोडण्यापेक्षा शेवटचा प्रश्‍न हा सत्याचा तळ गाठत असतो. शिकण्याच्या विविध माहितीस्त्रोतातून मिळणार्‍या विविध प्रकारच्या ज्ञाननिष्ठा अनेक प्रश्‍न उपस्थित करतात. प्रत्येक प्रश्‍नांची उत्तरे शोधली जाणे अपेक्षित आहे. प्रश्‍नांपासून पळवाट काढणे हे विज्ञानाला मान्य नसते. अन्यथा प्रश्‍न अनेक प्रश्‍नांना जन्माला घालतात आणि प्रश्‍नच त्यांच्या भावकीचा ससेमिरा सुरु करतात.

फरक करणे, तुलना करणे आणि प्रामाणिकपणे समजून घेणे हे विज्ञानवादाचे वैशिष्ट्य आहे. जे आहे ते तसेच आहे किंवा जे सांगितलेले आहे ते अगदी तसेच आहे मानणे वा त्याबद्दल आपले पूर्वग्रह करुन घेणे ही अंधश्रद्धाच आहे. ती नव्या विचारप्रवृत्तीला जन्माला येऊ देत नाही. त्यामुळे दिलेल्या माहितीवरुन फरक करणे किंवा तुलनात्मक पद्धतीने विचार करणे आवश्यक आहे. विज्ञानामध्ये कृतींना, प्रयोगांना, सर्वेक्षणातून मिळविलेल्या माहितीला फार महत्त्व आहे. प्रयोगाशिवाय नवे वैज्ञानिक सिद्धांत मांडता येत नाहीत. त्यासाठी अनेक कृती कराव्या लागतात. अगदी नियंत्रीत वातावरणात घडवून आणले जाणारे प्रयोग हे अत्यंत कृतीशील असतात. ते जोखमीचेच असतात. विज्ञान हे प्रयोगशील असते ते इतरांवर अवलंबून नसते. स्थल, काल परत्वेही ते अंतिम सत्य असते. नवे निष्कर्ष काढण्यासाठी, नवे सिद्धांत मांडण्यासाठी आणि मांडलेले सिद्धांत, निष्कर्ष, तर्क, अनुमान पडताळण्यासाठीही प्रयोगांची आवश्यकता असते. त्यासाठी प्रयोगशाळेची आवश्यकता असते. या प्रयोगशाळा जमीनीवर, पाण्याखाली, अंतराळात असतात. या प्रयोगशाळेत अनेक प्रकारचे विरल अथवा संहत असए प्रयोग केले जातात. त्यापैकी काहीच कालमर्यादित असतात.

विज्ञान शिकण्याच्या तसेच शिकविण्याच्या अनेक पद्धती आहेत. तसेच अनेक तंत्रे आत्मसात करण्याच्याही अनेक पद्धती आहेत. त्या विविध शास्त्र शाखांच्या अधीन आहेत. त्यामुळे अभ्यासकांना विशिष्ट शाखेतील विशेषतः मिळवावी लागते. एकाच विषयातील उपविषयांचे ते अभ्यासक बनतात. कधकीकधी त्या उपविषयातील घटक, उपघटकांच्या आशय विश्‍लेषणासाठी भव्यदिव्य प्रयोगशाळा उभारल्या जातात. म्हणूनच मानवाने मानवी जीवन जगण्याच्या विविध क्षेत्रात भरीव प्रगती केली आहे. जगातील औद्यागिक क्रांती हे त्या विज्ञान शोधांच्या आणि संशोधनाचीच देण आहे. या प्रगतीचे आता मूल्यमापन करणे कठीणच आहे. उत्तरोत्तर त्यात वाढ होत चालली आहे. मानवी जीवनच आता जगण्याची प्रयोगशाळा झालेली आहे. कारण मानवाने पहिला प्रयोगच माणसाचे सरासरी आयुर्मान वाढविण्यावर केलेला आहे. तसेच माणसासारखाच दुसरा माणूस नैसर्गिक नव्हे तर प्रायोगिक पद्धतीने निर्माण करणे हा त्याचा दुसरा प्रयोाग होय.

वैज्ञानिक उत्क्रांतीचे काही दुष्परिणामही आपल्याला जाणतवता. त्यामध्ये सर्वात मोठे नुकसान म्हणजे पर्यावरणाचा होत असलेला र्‍हास. यातून ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, वायू प्रदूषण आदी प्रदुषणांच्या विळख्यात मानव सापडला आहे. भौतिक सुखामागे लागलेला माणूस वैचारिक प्रदूषणाचीही निर्मिती करतो आहे. नैसगिक आपत्तीवर विज्ञानाने अजूनही मात केलेली नाही. त्यामुळे पर्यावरणात होत असलेले घातक बदल हे मानवी जीवनासाठी धोकादायकच आहेत. म्हणून मानव सुखी झाला तरी सुखी दिसत नाही. मानव अंतराळात वस्ती करु शकेल पण त्याला पर्यावरणाचे दुष्परिणाम आटोक्यात आणता आले नाहीत तर आजपर्यंतच्या वैज्ञानिक क्रांतीला काहीच अर्थ उठरणार नाही.

  • गंगाधर ढवळे, नांदेड.मो. ९८९०२४७९५३

You may also like