स्त्रीयांच्या हक्कांची चळवळ बुलंद करु या..!

८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जगभर उत्साहवर्धक वातावरणात साजरा केला जातो. या विषयाकडे वळण्यापूर्वी या दिवसाची ऐतिहासिक पार्श्‍वभूमी पाहणे गरजेचे वाटते. ८ मार्च १९०८ रोजी न्यूयॉर्कमध्ये वस्त्रोद्योगातील हजारो स्त्री कामगारांनी रुटगर्स चौकात जमून प्रचंड मोठी ऐतिहासिक निदर्शने केली. कामाचे तास अधिक पण त्या बदल्यात मोबदला मात्र कमी, अशी परिस्थिती तिथे होती त्यामुळे कामाचे तास कमी करणे, मोबदला वाढवणे तसेच कामाच्या ठिकाणी सुरक्षितता या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या. त्याचप्रमाणे लिंग, वर्ण, मालमत्ता व शैक्षणिक पार्श्‍वभूमीनिरपेक्ष सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांना मतदानाचा हक्क मिळावा अशी मागणीही जोरकसपणे केली. अमेरिकन कामगार स्त्रियांच्या या व्यापक कृतीने क्लारा झेटकीन प्रभावित झाली. १९१० साली कोपनहेगन येथे भरलेल्या दुसर्‌या आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील स्त्री कामगारांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीच्या स्मरणार्थ ८ मार्च हा जागतिक महिला दिन म्हणून स्विकारावा असा जो ठराव क्लाराने मांडला, तो पास झाला. हा झाला इतिहास.

८ मार्च हा दिवस संपूर्ण भारतभर वेगवेगळे कार्यक्रम घेऊन साजरा केला जातो. महिलांना त्यांच्या उत्तम कार्यासाठी पुरस्कार देऊन गौरन्वित केल्या जाते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत सर्व जगातच स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. उपभोग आणि कष्ट असा स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टीकोन समाजात रुढ होता. समाजाकडून मिळणार्‌या प्रत्येक अधिकारापासून हा स्त्री वर्ग वंचित होता. सतीप्रथा, केशवपन, अकाली वैधव्य या आणि अशा कितीतरी संकटांनी जखडून स्त्री जगत होती. मात्र एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर स्त्रियांमध्ये आपले अधिकार हक्क, कर्तव्य, समानता, आपल्यावर होणारे अन्याय इ. बाबतीत सजगता निर्माण झाली. यातून जन्म झाला तो स्त्रीवादाचा म्हणजेच फेमिनिझमचा. याचे फलित म्हणजे स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून कार्य करताना दिसत आहेत. असे असले तरीही खरोखरच आजची स्त्री खर्‌या अर्थाने स्वतंत्र झाली का? हा प्रश्‍न आजही तेवढ्याच प्रकर्षाने उद्भवतो. कारण एकीकडे प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्रातील कित्येक महिला सरपंच ध्वजारोहण करतात, ही फार अभिमानाची गोष्ट समजल्या जाते पण त्याच महिला सरपंचांना मात्र राजकीय पातळीवरील निर्णय प्रक्रियेत डावलतांना दिसून येते. याचे मुख्य कारण म्हणजे भारतात असणारी पुरुषप्रधान संस्कृती. किंबहुना स्त्रीचं वर्चस्व पुरुषांना कधी रुचलं नव्हतं, रुचत नाही आणि रुचणारंही नाही. खरे तर राजकीय सत्तेवरील महिलांचा सहभाग हा गुणात्मक स्वरुपाचा असणे ही आजची नितांत गरज आहे. आजही बहुतांश ठिकाणी स्त्रियांच्या गुणात्मक सहभागासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न पुरुषवर्गाकडून न होता, उलट महिलांचा आहे तो सहभाग कसा डावलला जाईल, याकडे जास्त भर असतो.

आज बर्‌याच ठिकाणी स्त्री-मुक्ती हा शब्द ऐकतो पण अद्यापही या शब्दाचा अर्थ आपल्याला नीटसा कळलेला नसल्याचे जाणवते. स्त्री-मुक्ती म्हणजे काय? तर स्त्रीची मुक्ती पण कशातून? गुलामगिरीतून? लाचारीतून? अत्याचारापासून? की पुरुषांच्या मक्तेदारीतून? आणि ही मुक्ती करायला स्त्रीला बांधून ठेवलंय कोण? तर तिने स्वतःच स्वतःला बांधून घेतलंय कधी मर्जीनं तर कधी गैरमर्जीनं स्त्री- मुक्ती संदर्भात विचारपिठावर भाषण देणारी स्त्रीयांच्यावर होणार्‌या अन्यायाला वाचा फोडणारी स्त्री घरी गेल्यानंतर अतिशय नम्रपणे सर्व कामे करते, सर्वांची मर्जी सांभाळते, वेळप्रसंगी अपमानही सहन करते म्हणजे ज्या स्त्रीमुक्तीसाठी स्त्री अट्टाहास करते, त्याचा तिला स्वतःलाच अर्थ कळालेला नाही. महिला दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पुरुषांचा स्त्रीबद्दलचा असणारा दृष्टीकोन बदलणे होय. कारण जोपर्यंत पुरुषांच्या दृष्टीकोन बदलणार नाही, तोपर्यंत स्त्री मुक्त होणार नाही. आता हा दृष्टीकोन म्हणजे नेमके काय? तर स्त्रीला माणूस म्हणून समानतेने जगण्याचा अधिकार देणे होय. घरातील गृहिणी सर्व जबाबदार्‌या अतिशय चोखपणे पार पाडते. पण घरातील महत्त्वाच्या निर्णयात तिच्या मताचा कधीच विचार केला जात नाही. या दृष्टिकोनातही बदल होणे गरजेचे आहे.

यापुढे जाऊन मी असे म्हणेन की, महिला दिनाच्या अनुषंगाने स्त्री-पुरुष समानतेचा मुद्दाही लक्षात घेणे तेवढेच गरजेचे आहे. आज सर्वजण समानता अंमलात आली पाहिजे याविषयी बोलताना दिसून येतात. आणि हीच माणसे घरात मुलगाच हवा, मुलगी नको असा आग्रह धरतात. मूळात हा आग्रहच मोडून काढला पाहिजे. यासाठी विशेष प्रयत्न स्त्रियांनीच करणे गरजेचे आहे. कारण सुनेला मुलगा व्हावा असा आग्रह धरणारी सासूही एक स्त्रीच असते ना! स्त्रीला आजही उपभोगाच्या नजरेनं बघितलं जातं. सुडौल बांध्याच्या सुंदर, उफाड्याच्या तरुणीला लालसेनं बघणार्‌या नजरा अधिक असतात. परस्रीकडे पाहण्याच्या अगदी लहानपणापासून ढळत्या वयाच्या स्त्रीपर्यंत लैंगिक शोषणाच्याच त्या नजरा असतात. कचरा वेचणार्‌या, गरीबीनं नाडलेल्या, असहाय्य असलेल्या, आश्रमशाळांतील मुली, मतिमंद असलेल्या मुली, वेडसर स्त्रिया, रात्री उशिरापर्यंत बाहेर असलेल्या मुली वखवखलेल्या नजरेनं घेरलेल्या असतात. कामाच्या ठिकाणीही स्त्रिला लैंगिक शोषणाची बळी ठरावी लागते. ती स्वतःच्या बदनामीला प्रचंड घाबरते. गप्प राहणं पसंत करते. व्यवस्थेच्या पारंपारिक रुढी बंधनांच्या विळख्यात स्वतःची प्रतिष्ठा तिला काचेच्या भांड्याप्रमाणे भासते. त्यामुळे मीटु सारखी चळवळ उभी राहायला वेळ लागला. जीवनातली सर्वच क्षेत्रे लैंगिक छळवादाने बरबटलेली आहेत.

घरातही तिची मानहानी होत असते. जुन्या काळी घरातली सर्वच मंडळी छळ करीत असत. त्यात सासू नावाचा प्राणी आघाडीवर होता. हुंड्यापायी जाळून मारण्याच्या हजारो घटना घडलेल्या आहेत. मुलीच होतात म्हणून छळाच्याही घटना कमी नाहीत. एकीकडे स्रीस्वातंत्र्याचे पोवाडे मुक्तकंठाने गायचे आणि दुसरीकडे स्रीनेच स्रीचा दुःस्वास करायचा, तिला पारतंत्र्यात ढकलण्याची सोय करून ठेवायची. आता कायदे भरपूर आहेत. तसे त्याचे फायदेही आहेत पण सगळ्या त्या कालावधीत तिचं असं काही उरत नाही. आयुष्य एकदा विस्कटलं की ते सावरणं कठीणच असतं. ग्रामीण भागातही मुलीच्या शिक्षणावर गदा येते कमी वयातच लग्न होतात त्यामुळे नवरा गेल्यानंतर आयुष्यभराचं वैधव्य येतं. पुरुषांना शूरवीर मानतात पण बरेचजण डरपोक असतात. जगणं कठीण वाटू लागलं की तो आत्महत्येचा विचार करतो. पण सीमेवर लढणार्‍या सैनिकांच्या आणि आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या विधवांनी आयुष्य कसं कंठायचं? हा अत्यंत गंभीर प्रश्‍न आहे.

स्त्रिया ह्या जितक्या पुरुष प्रधान संस्कृतीच्या अधीन असतील तितक्या त्या गुलाम होत जातात. स्वतःचं शिक्षण आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची कला नसल्यामुळे आणि सर्वस्वी इतरांवर अवलंबून राहत असल्यामुळे त्यांचं आयुष्य उद्धवस्त होत राहतं. अंधश्रद्धा आणि अज्ञानामुळे ग्रामीण स्त्रियांचे तर वाटोळे झालेलं आहे. मी ज्या क्षेत्रात काम करीत होते तिथे अनेक स्त्रिया ह्या मसनजोगी, कैकाडी या जमातीच्या होत्या. कैक पुरुषांना व्यसने होती. काही स्त्रियाही व्यसनाधीन होत्या. शिक्षणाचा अभाव आणि जमातीच्या रीतीरिवाजामुळे त्या आदीम परंपरेच्या जबड्यात त्यांच्या जीवनाचं सौंदर्य मरत होतं. मी त्यांना जागं केलं. शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर वेगानं पडत असलेल्या मुलींना मी फार कष्टानं प्रवाहात आणलं. त्यांना विविध योजनांची माहिती दिली. त्यांना फायदे करुन दिले. याकामी मला प्रचंड त्रास सहन करावा लागला. मनःस्तापही झाला परंतु एक समजलं की सतीच्या चालीपासून गर्भातच मुलींना मारण्याच्या या प्रदीर्घ कालखंडात स्त्री ही अजून मागासलेली आणि स्वातंत्र्यानं नाकारलेली आहे. ती अजूनही शोषितच आहे. उपभोगाचीच वस्तु आहे. तिनं स्विकारलेल्या अनेक आधुनिक तत्त्वप्रणालीलाही जिथे तिथे मर्यादा घातलेल्या आपल्याला आढळून येतील. कुठेन कुठे तरी तिचं दमन घडवून आणण्याची लॉबी कार्यरत असल्याचंही आपणांस दिसून येईल. या सर्वच समस्यांची सोडवणूक म्हणजे स्त्रियांकडे तिच्या व्यक्ती स्वातंत्र्याकडे बघण्याचा व्यवस्थेची दृष्टी बदलणं आवश्यक आहे.

स्त्री ही एका काळाची पत्नी तर अनंत काळाची माता असते. या वचनाप्रमाणे ही माता आपल्या स्त्री-शक्तीचा वारसा पुढील पिढ्यांना देतच राहते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री खंबीरपणे उभी असते, याचे उदाहरण म्हणजे छ. शिवाजी महाराजांच्या जडणघडणीत राजमाता जिजाऊ यांचा वाटा. स्वराज्याची संकल्पना जरी शहाजीराजे भोसले यांची असली तरी स्वराज्याच्या स्वप्नाला मूर्त रुप आणले ते राजमाता जिजाऊंनीच. तसेच स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणार्‌या म. फुलेंच्या पाठीशी खंबीरपणे साथ होती ती सावित्रीबाई फुले यांची. सबंध भारताला राज्यघटनेचा अनमोल ठेवा देणार्‌या डॉ. बाबासाहेबांच्या पाठीशी माता रमाई होत्या, असे कितीतरी उदाहरणे देता येतील. शेवटी जगातील सर्व महिलांना शुभेच्छा देतांना एवढेच सांगू इच्छिते की, मी एक स्त्री आहे, असे विधान जेंव्हा आनंदाने आणि अभिमानाने प्रत्येक स्त्री करु शकेल तेंव्हा आणि तेंव्हाच महिला दिन खर्‍या अर्थाने साजरा होईल अशी अपेक्षा करुया. स्त्रियांच्या हक्काची ही चळवळ बुलंद करुया आणि सावित्रीच्या लेकी होऊन पुढेच चालत राहूया…!

  • पंचफुला शामराव वाघमारे, नांदेड, मो- ७७०९८४९७९७.

You may also like