…..आता मतदारांसाठीही आदर्श आचारसंहितेची आवश्यकता

देशात गेल्या वर्षभरापासून निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. सर्वच राजकीय पक्षांसह जनतेलाही उत्सुकता असलेल्या सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आणि माध्यमांनी सत्तेचा महासंग्राम, लोकशाहीचा उत्सव, सत्तासंग्राम, निवडणुकीची सप्तपदी अशा शब्दांत १० मार्च रोजी आदर्श आचारसंहितेसह जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमाचे स्वागत केले. निवडणूक म्हटले की, आचारसंहिता आली त्यातही आदर्श आचारसंहिता म्हणजे राजकीय पक्षांसह सर्वच उमेदवार, पक्षकार्यकर्ते, नेते अशा सर्वच संबंधित व्यक्तींसाठी मतदानपूर्व आणि निकालपूर्व कालखंडात आपल्या वागण्या बोलण्याचे काटेकोर नियम पाळण्याचे भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग ते तालुका दंडाधिकारी यांच्यापर्यंत सर्वच निवडणूक संस्था आवाहन करीत असतात. या आदर्श आचारसंहितेची मार्गदर्शक तत्त्वे या सर्वच संबंधितांपर्यंत पोहचविण्यात येतात. तसेच अधिक माहितीसाठी निवडणूक कार्यालयात संपर्क साधून माहिती घ्यावी असेही कळविण्यात येते. लोकसभा मतदार संघातील जिल्हाधिकारी हे कोणतीही निवडणूक शांततेत, मोकळ्या व निर्भय वातावरणात पार पाडली जावी ह्याकरीता निवडणूक प्रक्रियेशी संबंधित सर्वांनाच आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन करतात. देशभरात सर्वच प्रशासकीय यंत्रणांकडून वारंवार हे आवाहन केले जाते.

काय असते ही आदर्श आचारसंहिता? शासकीय, प्रशासकीय यंत्रणेला नव्या नियुक्त्या, वित्तीय अनुदान जाहीर करता येत नाही, नव्या कामांची, नव्या योजनांची घोषणा किंवा सुरुवात करता येत नाही. शासकीय कार्यालये, वाहने, विश्रामगृहे यांचा वापर प्रचारात्मक कार्यासाठी करता येत नाही. सार्वजनिक ठिकाणी दृश्य स्वरुपात जाहिरात करता येत नाहीत, मतदारांना कोणतीही प्रलोभने, भूलथापा देता येत नाहीत. मतदारांना आकर्षित करता येईल असे कोणतेही कार्यक्रम करता येत नाहीत. कोणत्याही कारणास्तव दोन गटात, समाजात वैमनस्य किंवा तणाव निर्माण होईल अशी कृती करता येणार नाही. प्रचारा दरम्यान भाषा, जात, धर्म, वंश आदी मुद्यांचा आधार घेऊन भावनिक मद्दा बनविता येणार नाही. या काळात परवानगीशिवाय सभा घेण्यास निर्बंध असून कोणत्याही स्वरुपाचे मोर्चे, आंदोलने कोणत्याही सामाजिक, शैक्षणिक वा धार्मिक संघटनांना करण्यास बंदी असते. अशा अनेक छोट्या-छोट्या बाबी आहेत. ज्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होऊ शकते त्या बाबी घडणार नाहीत, घडवून आणल्या जाणार नाहीत यासह सोशल मिडियावरही करडी नजर ठेवली जाणार आहे.

आता मतदारांसाठीही एक आदर्श आचारसंहिता असावी असा एक सुजाण मतदार विचारवंतांमध्ये विचारप्रवाह आहे. हे मतदार लोकशाहीवर प्रेम करतात. लोकशाहीत अंतर्भूत नीतिमूल्यांवर प्रेम करतात. परंतु त्यापैकी बरेच घाबरट असतात. प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध ‘ब्र’ ही काढायचे नसते किंवा सत्तेपुढे शहाणपण नसते हे व्रत्तविधान या व्यवस्थेनेच साम, दाम, दंड भेद या नितीचा अवलंब करुन लादले जाते. हे त्याचे लादलेपण अनेकवेळा ‘री’ ओढताना दिसते. त्यामुळे सर्वसामान्य मतदार भयभीत झालेला आपल्याला दिसतो. तेंव्हा ही अनामिक भिती लक्षात घेऊन आयोगानेच आता मतदारांसाठी त्यांना नेहमीच पडत असलेल्या प्रश्‍नांना उत्तरे देणे व शंका निरसनासह काही अधिकार देण्याचा विचार केला. यामध्ये आचारसंहितेचा कोणत्याही राजकीय पक्ष अथवा उमेदवाराकडून भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास मतदार तक्रार करु शकतात. त्यासाठी मोबाईल ऍपचीही निर्मिती करण्यात आली आहे. तक्रारीनंतर केवळ शंभर मिनिटांतच काय तक्रार केली याची माहिती मिळू शकेल. मात्र भ्याड मतदारांना नाव उघड न करण्याच्या अटीवर अभय देण्यात आले आहे. निवडणूक काळात प्रचारादरम्यान वेळेचे नियम, ध्वनीप्रदुषणाचे नियम, फलक-बॅनर, झेंडे वापरण्याचे नियम न पाळणार्‍या विरोधातही तक्रार करता येणार आहे. तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांबाबत काही माहिती असल्यास जी की संबंधिताने उमेदवारी अर्जात किंवा त्याने दिलेल्या जाहिरातीत लपविलेली आहे अशा बाबतीतही तक्रार दाखल करता येणार आहे. नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मुद्दा, शहीद जवान, अभिनंदन यांचा फोटो, सर्जिकल स्ट्राईक, धार्मिक प्रार्थनास्थळे, मंदिरे, विविध आंदोलनातील फोटो अशा काही मतदारांना भावनिक करणार्‍या बाबींचा समावेश प्रचारा दरम्यान करता येणार नाही.

निवडणूक आयोगाने सर्वांनाच अशा पद्धतीने आचारसंहिता घालून दिलेली असली तरी त्यातून पळवाटा काढण्यात अनेक जण माहीर असतात. अनेक मतदारच प्रचंड हुशार असतात. हे मतदारच कधी कधी राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, प्रचारक असतात. आचारसंहितेचे काटेकोर पालन होते की नाही हे पाहण्याची जबाबदारी आयोगाकडे असली तरी देशद्रोहाच्या नव्या व्याख्या करणार्‍या देशभक्तांचीही तेवढीच आहे. अत्यंत शिताफीने निवडणुकीकरीता पैसे, दारुचे बॉक्स अथवा इतर प्रलोभनात्मक व आकर्षक वस्तु पुरविणारे कार्यकर्ते पूर्वाश्रमीचे मतदारच असतात. मोठ्या प्रमाणात जो छुप्या पद्धतीने खर्च करण्यात येतो त्यात पैसे वाटणे, जेवणावळी झडणे, कार्यकर्त्यांची चंगळ मंगळ यात मतदारांचीही मूक संमती असते. पैसे घेऊन मत विकणार्‍या मतदारांना हे उघड्या डोळ्यांनी पहायला काहीच वाटत नाही. कारण गेल्या पाच वर्षात आम्हाला काहीच मिळत नाही अशी त्यांची भावना असते. तेंव्हा या काळात जेवढे काही मिळेल ते पदरात पाडून घेण्याची चुरस निर्माण होते. त्यामुळे काहीतरी घेऊन मतदान करण्याची नव्हे मते विकण्याची एक लोकशाहीतील नवी जमातच निर्माण झाली आहे. घरातील एकूण मते किती? मतदार यादीत असलेल्या एकूण नावांचा उच्चार करुन प्रत्येकी किती रुपये द्यायचे याचे गणित ठरलेले असते. एखाद्या नगरपालिकेच्या एखाद्या वॉर्डात एका मताला किती पैसे दिले याची मोठीच चर्चा होते आणि ती पुढच्या निवडणुकीपर्यंत लक्षात ठेवली जाते. जागोजागी तपासणी नाक्यांची स्थापना करुनही पैसा कसा पोहोचतो, हे न उकलणारे गूढ आहे. हे सर्वांनाच माहिती असल्यामुळे कोणत्या मतदार संघात एकूण किती खर्च येईल याचाही हिशोब होतो आणि त्यातून एखाद्या मतदारसंघात जनसंपर्क, गुणवत्ता, सचोटी, पक्षनिष्ठा, जनहिताची तळमळ इत्यादी गोष्टींना तिलांजली देऊन पैशांचे गाठोडे बांधून नेले की कुणीही निवडून येतो असा एक निष्कर्ष काढण्यात येतो.

हल्ली मतदारांमध्ये मतदान प्रक्रियेबाबत कमालीची उदासिनता दिसून येते. मतदान न केल्यामुळे काय फरक पडतो? असा विचार करुन मिळणारी सुट्टी आनंदात घालविणारे महामतदार आपल्याकडे काही कमी नाहीत. सध्या देशात नव्वद कोटींपेक्षाही जास्त मतदार असून २०१४ च्या तुलनेत ८.५ कोटींनी वाढ झाली तर निव्वळ १.९ कोटी नवमतदार असल्याची माहिती आहे. शेवटचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी नाव मतदार यादीत येणार असून मतदान करण्यासाठी इतकी उदासिनता का? असा प्रश्‍न पडल्यावाचून राहत नाही. एकदा निवडणुक झाली की त्या मतदारसंघाकडे ढुंकूनही पहावयाचे नाही किंवा गोड बोलून दिवस काढायचे असे त्या विजयी उमेदवाराने ठरविले तरीही मतदारांवर काहीही परिणाम जाणवत नाही. सर्वसामान्य मतदार तसेही आयुष्यभर वीज, घरे, पाणी, रस्ते, नाल्या आदी मुलभूत व आवश्यक गरजांबाबत संघर्ष करतच असतो. पैसे घेऊन मतदान करणार्‍या मतदाराला आपल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारण्यासाठी तोंडच नसते, हे लक्षात घेतले पाहिजे. याचे प्रस्थ वाढत गेले, काळ सोकावत गेला आणि अनेक मतदारसंघातल्या प्रत्येक वॉर्डातच मत विक्रीला काढणार्‍या मतदारांचा एक गावच वसलेला आहे, हे आपल्याला पाहिले तर दिसून येईल. सगळेच घेतात म्हणून आपणही घ्यायला पाहिजे अशी मानसिकता आता झपाट्याने जनमाणसांत रुजायला लागलेली आहे. परंतु यातही अपवादात्मकरित्या काही सुजाण मतदार असतात. ज्यांचा याच लेखाच्या तिसर्‍या उपोद्घातात उल्लेख आलेला आहे, असे विचारवंत मतदार लोकशाहीनिष्ठच असतात. ते कोणत्याही लालसेला, आमिषाला बळी पडत नाहीत. ते निद्रिस्त आणि जागेपणाच्या दुनियेत जागरणवादीच असतात. लोकशाहीतल्या नीतिमूल्यांशी एकनिष्ठ असतात. ते तात्त्वीक आणि सात्विक असतात. अशा मतदारांत नोटा घेणारे पण ‘नोटा’ ला मतदान करणारेही वैतागलेले मतदार दिसून येतात. त्याने काही फरक पडत नाही, असे उमेदवारांचे म्हणणे पडते आणि बहुसंख्य मतदारांसह राजकीय पक्षांचे निवडून येण्याकडे इतके लक्ष असते तितके ‘नोटा’ ला मिळालेल्या मतदानाकडे नसते. हे लोकशाहीत राजकीय पक्षांचे अपयशच म्हणावे लागेल.

मतदान प्रक्रियेत प्रत्यक्ष मतदान केंद्रात गेल्यानंतर मतदान कक्षात जाऊन मतदान कसे करावे? हे अनेक मतदारांना माहित नसते, त्यांना समजावून सांगावे लागते. विनाकारण गोंधळ घालणारे ते मतदारच असतात. दुसर्‍याचे अधिकारपत्र काही तरी लालच देऊन, धमकावून, अटी घालून आपल्याकडे घेणारे हे मतदारच असतात. काहीजण बायकोचे अंध, अपंग व्यक्तीचे, वृद्ध व्यक्तींचे मतदान करण्याचे अधिकारपत्र कुटुंबातील व्यक्ती घेतात तर काहीवेळा घरातली माणसेच आपल्याच घरातल्या व्यक्तींच्या म्हणण्याप्रमाणे मतदान करत नाहीत, असेही काही अंदाज आहेत. अशा विविध पैलूंच्या व्यक्तीमत्त्वाने घडलेले मतदान अनेक नव्यानव्या क्लृप्त्या शोधून काढतात. सध्या तर एक नवाच ट्रेंड आलेला पहावयास मिळतो आहे. साड्या बनवणार्‍या कंपन्या अफलातून प्रयोग करत असताना दिसत आहेत. एखाद्या लोकप्रिय नेत्याचे फोटो किंवा निवडणुक चिन्ह छापून साड्यांची भरमसाठ विक्री करण्याचे त्यांचे धंदेवाईक प्रयत्न सुरु आहेत. साड्यांची विक्री तर होईलच पण प्रचारही होईल. अशा साड्या घालून येणार्‍या स्त्रियांना मतदान केंद्र परिसरात प्रवेश देऊ नये. जवानांचे, सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईकचे साड्यांवर किंवा वापरावयाच्या कोणत्याही वस्त्रांवर फोटो छापणे हा त्यांचा अपमानच नव्हे तर करंटेपणाचे लक्षणच आहे. बुथवर गोंधळ घालणार्‍या, गावात हाणामारीचे प्रसंग आणणारे, मतदान प्रक्रिया बंद पाडणारे, उगाचच माहोल करणारे, मतदान अधिकार्‍यांशी हुज्जत घालणारे हे मतदारच असतात. ते नव्या वाटेवर स्वार झालेले असतात. काही मतदार भोळेभाबडे, धार्मिक भावनेने वेढलेले, एखाद्या विशिष्ट वातावरणाने भारलेले असतात. भूलथापांना बळी पडतात, निवडणुक जाहीरनाम्याला, आश्‍वासनाला ते भूलतात. एखादी भावनिकतेची, सहानुभूतीची लाट निर्माण होते नव्हे, ती निवडणुकीपूर्वी आणली जाते. त्या लाटेच्या प्रवाहात आगतिकपणे वाहवत जातात. आपल्या देशात स्वातंत्र्यानंतर निवडणुकीपूर्वी अनेक लाटा निर्माण झाल्या आहेत. या लाटा गरीबी, भूकमारी, बलिदान, भ्रष्टाचार, सहानुभूती, धार्मिक भावना, देशभक्ती अशा विषयावर निर्माण झालेल्या आहेत. त्या मतदान मिळविण्यासाठी आणि निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर विजयी होण्यासाठीच कृत्रिमरित्या तयार करण्यात आल्या होत्या. विकासाच्या सिद्धांतावर आधारित एकही लाट या देशात निर्माण झालेली नाही, हे अत्यंत संतापजनक आहे.

निवडणुका ह्या मुख्यत्वे जात या धार्मिक अवयवावर लढल्या जातात. कोणत्या जातीचे, कुठे, किती मते आहेत याचा अभ्यास करुन कुठे, कोण निवडून येईल? कोणाचा पराभव होईल याचे ते साधे गणित नसते. तर ते जातीय समिकरण तयार होत असते. तसे काही असेल तर राजकीय खेळीला मतदार बळी पडतात आणि विशिष्ट जातीची मते खाण्यासाठी एखाद्या उमेदवाराला उभे करुन राजकीय पोळी शेकण्याची चाल यामुळे यशस्वी होते. आपला देश जातीनिहाय मोर्चांचा प्रदेश आहे. निवडणुकीपूर्वी किंवा त्या दरम्यान जयंत्या, सण, उत्सव साजरे करण्यासाठी विविध सामाजिक संघटना, संस्थांना, समूहांना राजकीय रसद पुरवली जाते. जातीनिहाय विखारी मुद्दे पुढे करुन विषारी प्रचार केला जातो. एखाद्या उमेदवाराची माहित नसलेली जात उकरुन काढली जाते आणि इतर जातींना मतदान करण्यास प्रतिबंध घातला जातो. यातही मतदारांचा सर्वसमावेश असतो. संविधानकर्त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे लोकशाहीचे एक मत, एक मूल्य ही मानवतेच्या सौंदर्याची देण दिलेली आहे. पण हे मूल्यच आपण विसरत चाललो आहोत. मताधिकार ही लोकशाहीची अमूल्य देणगी आहे. देशाप्रती निष्ठा व्यक्त करणारे ते संविधानातील महामूल्यच आहेत. ते बुद्धाच्या गणतंत्र नितीचे सौंदर्य आहे. मानवी स्वातंत्र्याचे अस्तित्व त्यामुळे लोकशाहीतच बहरुन येत असते. तेंव्हा ही मते न विकता, जातीपातीचे राजकारण न करता धर्मविरहीत लोकशाहीच्या विकासास पोषक अशी निवडणूक प्रक्रिया पार पडेल आणि नवे सरकार सशक्त लोकशाहीचा पर्याय देईल अशी अपेक्षा करु या…!

………गंगाधर ढवळे, नांदेड, मो. ९८९०२४७९५३.

You may also like