अल्पवयीन युवतीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला 10 वर्षे सक्तमजुरी

26 हजार 500 रुपये रोख दंड; दंडातील 25 हजार रुपये युवतीला

नांदेड शहराच्या नदीपलिकडे एका वस्तीत अल्पवयीन बालिकेला पळवून तिच्यावर अनेकवेळेस अत्याचार करणाऱ्या 22 वर्षीय युवकाला तिसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.सय्यद यांनी 10 वर्षे सक्तमजुरी आणि 26 हजार 500 रुपये रोख दंड ठोठावला आहे. दंडाच्या रकमेतील 25 हजार रुपये रोख रक्कम पिडीत युवतीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

दि.30 मार्च 2016 सायंकाळी 6 वाजता एक 15 वर्षीय बालिका गायब झाली. कांही वेळानंतर तिच्या वडीलांना फोनवर मॅसेज आला त्यावर मी नमन गजभारे आहे. तुमची मुलगी माझ्याजवळ आहे आणि मी तिच्यासोबत लग्न करणार आहे असे त्या मॅसेजमध्ये लिहिले होते. यानंतर युवतीची शोधाशोध झाली पण ती सापडली नाही. प्रथम युवतीला पळवून नेले म्हणून भारतीय दंडविधानाच्या कलम 363,366 नुसार गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक रामचंद्र करपे यांच्याकडे होता. 4 एप्रिल रोजी ती बालिका घरी परत आली. तिने दिलेल्या माहितीनुसार एक मुलगा मागील 15 ते 20 दिवसांपासून तिच्या घराच्या आसपास फिरत होता अनेक वेळी तिला बोलण्याचा प्रयत्न केला. पण तिने प्रतिसाद दिला नाही. तेंव्हा 3 मार्च 2016 रोजी तिला बळजबरी ऍटोत घालून एका बंद घरात खिडकीद्वारे प्रवेश करून आत नेले त्या घरात कोणीच राहत नव्हते तेथे तिच्यावर अत्याचार केला आणि नंतर त्याने तीला वसमतला नेले. तेथून पुन्हा नांदेडला आणले. पुन्हा एका रुमवर राहिले तेथे तिच्यावर अत्याचार केला आणि 4 एप्रिल 2016 रोजी दिवसभर निलगिरींच्या झाडांमध्ये वास्तव्य करून सायंकाळी तिला घरी सोडून दिले.

बालिकेने आपल्यावर घडलेले सर्व प्रसंग 5 एप्रिल 2016 रोजी आपल्या वडीलांना सांगितले. ही माहिती पोलीसांना देण्यात आली आणि त्या प्रकरणात 376(2) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियमाच्या कलम 4 आणि 6 ची वाढ झाली . पोलीसांनी 10 एप्रिल रोजी बालिकेवर अत्याचार करणारा साहेबराव उर्फ चोर बाळ्या देविदास गजभारे (22) यास अटक केली आणि तपास पुर्ण करून न्यायालयात दोषरोपपत्र सादर केले. न्यायालयात याप्रकरणी 10 साक्षीदार तपासण्यात आले. अस्तिव्यंग शाळेत युवकाने त्या बालिकेवर केलेला अत्याचार न्यायालयासमक्ष आला. एकूण उपलब्ध पुराव्यानुसार तिसरे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस.सय्यद यांनी साहेबराव उर्फ चोर बाळ्या देविदास गजभारे यास बालिकेवर अत्याचार केल्याप्रकरणी कलम 376(2) (1) (एन) प्रमाणे 10 वर्षे सक्तमजुरी आणि 25 हजार रुपये रोख दंड, कलम 363 नुसार 1 वर्षे सक्तमजुरी आणि 500 रुपये रोख दंड, 366(अ) प्रमाणे तीन वर्षे सक्तमजुरी आणि 1 हजार रुपये रोख दंड अशा शिक्षा ठोठावल्या. या सर्व शिक्षा साहेबराव गजभारेला सोबत भोगायच्या आहेत. अशी माहिती सरकारी वकील ऍड. संजय लाठकर यांनी दिली. दंडातील 25 हजार रुपये रोख रक्कम पिडित बालिकेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत अशी माहिती या खटल्याचे पैरवी अधिकारी पोलीस हवालदार फय्याज सिद्दीकी यांनी दिली.

…….रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड.

You may also like