एस टी आगार प्रमुखांवर आचार संहितेचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वजिराबाद पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या नांदेड बसस्थानकाअंतर्गत राजकीय पक्षांच्या योजनेच्या संदर्भात भिंती रंगविल्याबद्दल व पूर्वसूचना देवूनही सदरच्या भिंतीवरील रंगविलेला मजकूर न काढल्याबद्दल वजिराबाद पोलिसांनी आज आचारसंहितेच्या भंगासंदर्भात गुन्हा नोंदविला आहे.

मनपाचे सहायक आयुक्त प्रकाश गच्चे यांनी आज वजिराबाद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. नांदेड लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता दि.9 मार्चपासून लागू झाली. या दरम्यान सर्वच विभागांना आपापल्या भागातील असलेल्या राजकीय मंडळींचे पोस्टर, रंगविलेल्या भिंती याबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना तसेच त्या काढून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या होत्या. मात्र नांदेड बसस्थानकातंर्गत वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या मजकुरांच्या रंगविलेल्या भिंती जशाच्या तशा होत्या. पूर्वसूचना देवून देखील या रंगविलेल्या भिंती व त्यावरील मजकूर पुसण्यात आला नाही. त्यावरुन महाराष्ट्र मालमत्ता विरुपण प्रतिबंधक कायदा 1991 च्या कलम 3 सह कलम 180 अन्वये नांदेडच्या आगार प्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संदीप शिवले हे करीत आहेत.

You may also like