मांडवा (कि) ग्रा.पं.मध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करा

किनवट तालुक्यातील मौजे मांडवा(कि.) ग्रामपंचायती अंतर्गत सन् 2016 पासून आजतागायत पेसा योजना,चौदावा वित्त आयोग, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत जी विकासकामे करण्यात आली, त्यात ग्रामसेवक,सरपंच,उपसरपंच व सदस्यांनी संगनमताने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप तेथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष संतोष साळवे यांनी गटविकास अधिकार्‍यांना दिलेल्या लेखी निवेदनात केलेला असून, मांडवा ग्रामपंचायतीचे 1 ते 33 नमुना प्रपत्रांची/अभिलेखांची तपासणी करून दोषींवर कठोर कार्यवाहीची मागणी केली आहे.

निवेदनात तपशीलवार विवरण दिल्याप्रमाणे, पेसा योजनेअंतर्गत विकासकामे करतांना 2016 ते 18 पर्यंत एकूण 11 लक्ष 95 हजार 201 रुपये दोन टप्प्यात उचलण्यात आले. मासीक व ग्रामसभेमध्ये फक्त 5 लक्ष 65 हजार 629 रुपये खर्चाचा हिशेब दाखविण्यात आला आहे. उर्वरीत 6 लक्ष 29 हजार 572 रुपये कुठे व कसे खर्च झाले की त्याचा अपहार झाला याच्या चौकशीची मागणी आहे. चौदावा वित्त आयोगांतर्गत विकास कामे करण्यासाठी दोन टप्प्यात एकूण 16 लक्ष 01 हजार 446 रुपयांचा निधी उचलण्यात आला. मात्र 2016 ते 18 पर्यंत झालेल्या मासीक सभा व ग्रामसभेच्या ठरावांची पाहणी केली असता, फक्त 9 लक्ष 43 हजार 200 रुपयांचा हिशेब नमूद आहे. उर्वरीत 6 लक्ष 58 हजार 246 रुपयांचे काय करण्यात आले याचा ताळमेळ लागत नसल्याचे नमूद आहे. तसेच गतवर्षी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत फेब्रुवारी ते एप्रिल 2018 या तीन महिण्यात 35 लक्ष 28 हजार रुपये शासनाकडून निधी प्राप्त झाला होता. त्यापैकी खात्यावरून 32 लक्ष 26 हजार 855 रुपयांची उचलसुद्धा करण्यात आली. मासीक सभा व ग्रामसभेचे ठराव तपासले असता फक्त 6 लक्ष 72 हजार रुपयांचा हिशोब लागतो. उर्वरीत 25 लक्ष 54 हजार 855 रुपये कुठे खर्च झाले याच उल्लेख त्यात नाही. त्यामुळे सदर रक्कम शौचालय बांधकाम न करता फक्त बोगस लाभार्थ्यांची यादी करून ग्रामसेवक, सरपंच आदींनी संगनमताने अपहार केल्याचे उघड होते.

उपरोक्त तिन्ही योजनेअंतर्गत विकासकामांसाठी एकूण 60 लक्ष 23 हजार 502 रुपयांचा निधी खात्यावरून उचलण्यात आला. त्यापैकी 21 लक्ष 80 हजार 829 रुपयांचा तपशील मासीक सभा व ग्रामसभेत नमूद करून सदर रकमेची मान्यता घेतल्याचे दिसून येते. परंतु उर्वरीत 38 लक्ष 42 हजार 673 रुपये संगनमताने अपहार केल्याचे दिसून येते, असा आरोप निवेदनात आहे. तसेच उमराव चंपतराव साळवे यांची मालमत्ता क्र.27 ज्याचे क्षेत्रफळ 3 हजार 740 चौ.फुट आहे. त्या भूखंडाचा ग्रा.पं.मालमत्ता कर रू.2 हजार 300 हे पावती क्र.45 अन्वये 31 मार्च 2016 ला भरण्यात आले होते. मात्र आज रोजी सदर भूखंड जायमोक्यावर अकारण गोठविण्यात आला असल्याने त्याच्याही चौकशीची मागणी आहे.

मांडवा ग्रा.पं.मासीकसभा व ग्रामसभेमध्ये कोणत्याही प्रकारची विकास कामे करण्याबाबत ठराव न घेता संगनमतानेच गुपचुप निकृष्ट दर्जाची कामे करून घेतात. कामाबाबत कुठलेही माहिती फलक लावण्यात येत नाही. गावातील नागरिकांना अंधारात ठेऊन भ्रष्टाचार केला जातो. त्यामुळे या सर्वच प्रकरणाबाबत सखोल चौकशी करून ग्रा.पं.कारभार करण्यासाठी व अभिलेखे ठेवण्यासाठी 1 ते 33 नमुना प्रपत्रांची सुद्धा तपासणी करण्यात यावी आणि दोषींना निलंबित करून कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनात तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संतोष साळवे यांनी केली आहे. निवेदनाच्या प्रती राज्यपाल, ग्रामविकास मंत्र्यांचे खाजगी सचिव, विभागीय आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी, सहाय्यक जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.

You may also like