प्लॅन करून सोबत दारू पाजून खून करणाऱ्या तीन युवकांना जन्मठेप

अत्यंत किरकोळ कारणावरुन जुन्या विद्यापीठाच्या मुख्य व्दाराच्या आत एका 39 वर्षीय व्यक्तीचा खून करणाऱ्या तीन जणांना सहावे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विक्रमादित्य मांडे यांनी जन्मठेपेसह सहा हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

दि.12 मार्च 2017 रोजी दुपारी 3 ते 4 या वेळेदरम्यान सुनील भारती, आकाश बारसे आणि ज्ञानेश्वर हंबर्डे हे तिघे विद्यापीठाच्या जुन्या प्रवेशव्दाराच्या आत गोलाकार बसून दारु पीत होते. त्यावेळी बळीराम रामा गायकवाड तेथे आला आणि त्याने ज्ञानेश्वर हंबर्डेसोबत तू श्याम मराठेला चापड का मारली होती हा प्रश्न विचारुन वाद तयार केला. वादाचे स्वरुप वाढत गेले आणि रामा गायकवाडने आपल्याकडील तलवारीच्या साह्याने ज्ञानेश्वर बालाजी हंबर्डेवर जोरदार हल्ला केला. त्याच्या हातातून हत्यार पडल्यावर याला मारुन टाक असे रामाने उचकल्यावर आकाश बारसेने ते हत्यार उचलून ज्ञानेश्वरवर हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ज्ञानेश्वरला लोकांनी शासकीय रुग्णालयात नेले. पण रक्तस्त्राव आणि परिस्थिती यातून ज्ञानेश्वर हंबर्डे वाचू शकला नाही.

भास्कर बालाजी हंबर्डे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते तिघे भाऊ आईसह विष्णूपुरी येथे राहतात आणि मेस तथा किराणा दुकान चालवतात. 12 मार्च 2017 रोजी सुनील शाम भारती (21) रा.भारतीमठ गाडीपूरा नांदेड आणि आकाश बालाजी बारसे (18) पेक्षा अधिक रा.विष्णूपुरी नांदेड या दोघांनी ज्ञानेश्वर बालाजी हंबर्डे (39) यास बोलावून नेले आणि दारु पीत बसले होते. अगोदरच रचलेल्या कटानुसार राम उर्फ रामा बळीराम गायकवाड/कैकाडी (26) रा.विष्णूपुरी आला आणि माझ्या भावाची हत्या केली. नंादेड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा क्र.109/2017 दाखल केला. पोलीस उपनिरीक्षक परशुराम मराडे, त्यांचे सहकारी पोलीस मारोती मुसळे आणि बालाजी लाडेकर यांनी तपास पूर्ण करुन न्यायालयात सत्र खटला क्र.48/2017 दाखल केला.

न्यायालयात या प्रकरणी नऊ साक्षीदारांनी आपले जबाब न्यायालयात नोंदवले. उपलब्ध पुराव्याआधारे न्या. विक्रमादित्य मांडे यांनी भादंविच्या कलम 302 साठी जन्मठेप व पाच हजार रुपये रोख दंड, कलम 323 साठी एक वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये रोख दंड अशी शिक्षा तिघांना ठोठावली, अशी माहिती जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड.संजय लाठकर यांनी दिली. या खटल्यात नंादेड ग्रामीणचे पोलीस हवालदार फैयाज सिद्दीकी यांनी पैरवी अधिकाऱ्याची भूमिका बजावली. आज शिक्षा झाली तेंव्हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक खैरे, इतर पोलीस कर्मचारी आणि जलद प्रतिसाद पथकाचे जवान बोलाविण्यात आले होते.

या राम उर्फ रामा बळीराम गायकवाड, सुनील श्याम भारती आणि आकाश बालाजी बारसे या तिघांची दर पंधरा दिवसाला नांदेड न्यायालयात तारीख असायची तेंव्हा त्यांना आणले जायचे व न्यायालयाची प्रक्रिया सुरु असायची. अशाच एका तारखेला 31 डिसेंबर 2018 रोजी त्या तिघांना आणले असताना त्यांच्या घरच्या लोकांनी आणलेले जेवन खाऊ दिले नाही म्हणून या तिघांनी पोलिसांवर हल्ला केला होता. या प्रकरणी नांदेडच्या वजिराबाद पोलीस ठाण्यात कलम क्र.400/2018 दाखल आहे. आज शिक्षा झाल्यानंतर सहायक पोलीस निरीक्षक प्रभा पुंडगे यांनी या तिघांना 400 क्रमांकाच्या गुन्ह्यासाठी आमच्या ताब्यात तिनही आरोपी द्यावेत, अशी विनंती करणारा अर्ज न्यायालयात सादर केला आहे.

You may also like