साईनगर बालोद्यान कामाच्या चौकशीची मागणी

किनवट शहरात नगरोत्थानच्या निधीतून सुमारे ४८ लाख रुपये मंजूर असलेल्या, शहरातील साईनगर येथील बाल उद्यान विकसित करण्याचे काम दर्जाहीन होत आहे. उद्यानात गुत्तेदारांनी चक्क काळी माती टाकली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

महाराष्ट्र नगरोत्थान महानिर्माण अंतर्गत शहरातील साईनगर बाल उद्यान विकसित करणे, संरक्षक भिंतीची उंची वाढवणे, अंतर्गत रस्ते व अन्य कामांसाठी एकूण ४८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. शहराचा वाढता विस्तार पाहाता बाळ- गोपाळांच्या विरंगुळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मिळाल्याने, उद्यानाचे काम दर्जेदार होण्याची अपेक्षा होती. सदर उद्यानाच्या कामाचे कंत्राट यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथील बी.के.कन्स्ट्रक्शन कंपनी या नावाने असले, तरी प्रत्यक्षात काम मात्र ३ नगरसेवकांकडून करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. संरक्षक भिंतीची उंची वाढविण्यासाठी १८ लाख रुपये मंजूर होते. गुत्तेदारांनी भिंतीची उंची वाढविण्याच्या कामात कुठेच लोखंडी गजाचा वापर केला नाही. पूर्वीची भिंत अर्धवट पाडून त्यावरूनच उंची वाढवली आहे. पूर्वीच्या गुत्तेदाराने उद्यान परिसरात मुरूम टाकून बील उचलून घेतले असतांना आताच्या गुत्तेदारांनी निविदेत नसतानाही उद्यानात १५ ते २० ट्रॅक्टर काळी माती आणून टाकली. याबाबत ओरड होताच सदर माती उचलण्याच्या हालचाली सुरु आहेत. ती माती कुठून आणली, मातीसाठी संबंधित विभागाची परवानगी आहे का ? याची चौकशी व्हावी. उद्यान विकासाकरिता ४८ लाखांचा निधी आहे. अंदाजपत्रकाप्रमाणे काम होत आहे का? कामाचा दर्जा कसा आहे, हे पाहाण्यासाठी पालिकेचे संबंधित अभियंता अथवा प्रभारी मुख्याधिकारी कामाच्या ठिकाणी हजेरी लावत नाहीत. बहुतांश कामे कुठल्यातरी कंत्राटदारांच्या नांवे सत्ताधारी व विरोधी नगरसेवकच करतात, असा उघड आरोप नागरिकांतून होत आहे. निविदेत निकोप स्पर्धा होवून कामाचा दर्जा राखण्याऐवजी ‘ गुत्तेदार नगरसेवक ‘ टेंडर मॅनेज करण्यामध्येच धन्यता मानत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी उद्यानाच्या कामाची उच्यस्तरीय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी साईनगर येथील रहिवाशांनी केली आहे.

You may also like