नाटक समाज प्रबोधनाबरोबर संस्कृतीचेही वाहक

डॉ.जयंत शेवतेकर यांचे प्रतिपादन

नाटक किंवा चित्रपट हे केवळ उपजीविकेचे साधन नसून समाज आणि संस्कृतीचे वाहक आहे. या माध्यमात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ प्रसिद्धीच्या मागे न लागता बेसिक ज्ञान संपादन करून वैश्विक पातळीवर आपली नाममुद्रा उठविण्याचा प्रयत्न करावा. तरच या क्षेत्राला खऱ्या अर्थाने न्याय दिल्याचा आनंद साजरा करता येतो, असे प्रतिपादन प्रा.डॉ.जयंत शेवतेकर यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ललित व प्रयोगजीवी कला संकुलात दि.२८ फेब्रुवारी २०१९ रोजी आयोजित ‘साहित्यिक आपल्या भेटीला’ या उपक्रमांतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथील नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयंत शेवतेकर हे विशेष व्याख्याते म्हणून उपस्थित होते. यावेळी संकुलाचे समन्वयक डॉ.वैजनाथ अनमुलवाड हे अध्यक्षस्थानी होते. ‘नाटक, इतिहास आणि वर्तमान’ या विषयावर बोलतांना डॉ.शेवतेकर पुढे म्हणाले की, नाटक, अभिनय, नृत्य, संगीत, चित्र इ कला ह्या पूर्णतः व्यवसायिक आहेत. या क्षेत्रात स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या व्यक्तीला लौकीकतेबरोबरच समाधानकारक अर्थप्राप्ती देखील होते. परंतु तो जास्त हुरळून जाऊ नये. मर्यादांची चौकट सांभाळली की जगण्याला वेगळा अर्थ प्राप्त होतो.

तेंव्हा विद्यार्थ्यांनी या माध्यमाकडे गांभीर्याने पाहावे. वर्तमान कालीन बदलत्या मराठी रंगभूमीचा प्रवास नेमकं कोणत्या दिशेने होत आहे, याची जाण आणि भान ठेवून संबंधीतांनी काम केले तरच ही माध्यमे समाजहिताच्या दृष्टीने परिणामकारक ठरतात. नवोदित नाट्य कलावंतांनी आपली भूमिका मांडताना पूर्वीच्या कसदार कलावंतांचे आदर्श समोर ठेवायला हवे, असेही ते म्हणाले. अध्यक्षीय समारोपात डॉ. वैजनाथ अनमुलवाड म्हणाले की, मराठी नाटक आणि रंगभूमीचा इतिहास नीटपणे समजून घेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल करावी. नाटक हे गतकाळापासूनच्या समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम राहिली आहे. वर्तमानकाळात या माध्यमात नेमके कोणते बदल झाले आहेत. याविषयी तुलनात्मक अभ्यास करून ‘नाटक’ या प्रकारात वेगळ्या वाटा शोधाव्यात. नाटक, संहिता, पटकथा, अभिनय आणि या क्षेत्रांशी संबंधित संधीच्या अनेक वाटा आहेत. त्यांचा नेमकेपणे शोध घेऊन करिअर निर्माण करावे. यावेळी संकुलातील कर्मचारी, विद्यार्थी व कलावंत उपस्थित होते.

You may also like