कंधार तहसिलवर मातंग समाजाचा मोर्चा धडकला

आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या तोकतोडे कुटूंबाला आर्थिक मदत द्या

गेल्या अनेक वर्षांपासून शासन दरबारी मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे म्हणून प्रश्न प्रलंबित आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाचे अनुसूचित जातीत वर्गीकरण करुन आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनेने धरणे आंदोलने केली होती.परंतु शासनाच्या वतीने कसलीच दखल घेतली नसल्यामुळे मातंग समाजातील तरुण संजय भाऊ ताकतोडे यांनी जलसमाधी घेऊन बलिदान दिले. शहीद संजयभाऊ ताकतोडे यांच्या कुटुंबाला सुमारे एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करुन त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय सेवेत घ्यावे. यासह समाजाच्या विविध मागण्यासाठी दि.11 मार्च रोजी कंधार तहसिलवर सकल मातंग समाजाचा वतिने भव्य मोर्चा काढण्यात आला होता.

लोकसंख्येच्या प्रमाणात मातंग समाजाला अनुसूचित जाती चे वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने गेल्या अनेक वर्षापासुन आंदोलने, मेळावा, सत्याग्रह करुन जनजागरण करून लक्ष वेधण्यासाठी हजारो मोर्चा काढण्यात आले होते .तरीही मातंग समाजाच्या या मागणीची शासन दरबारी नोंद होत नसल्यामुळे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील साळेगाव येथील संजय भाऊ ताकतोडे या तरुणाने दिनांक 5 मार्च 2019 रोजी शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करत जलसमाधी घेऊन आपली जिवन यात्रा संपली होती. त्यामुळे ताकतोडे कुटुंबावर आभाळ कोसळले असून मातंग समाजाने या ढाण्या वाघ गमावलेला आहे. ती घटना समाजासाठी संतापजनक आहे आणि या घटनेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस जबाबदार आहेत. म्हणून मुख्यमंत्री यांच्यावर आत्महत्येचा गुन्हा दाखल करा या प्रमुख मागणीसह संजयभाऊ ताकतोडे यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत करुन दोन व्यक्तींना शासकीय सेवेत सामावून घ्यावे. क्रांतिवीर लहुजी साळवे अभ्यास आयोगाच्या सर्व शिफारशी तत्काळ अंमलबजावणी करावी. मुंबई विद्यापीठाला अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे .पुणे येथे लहुजी साळवे यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभे करावे.

साळेगाव तालुका केज या मूळगावी संजय भाऊ यांचे स्मारक उभे करावे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाला दोन हजार कोटी रुपयांचे भांडवल उपलब्ध करून द्यावे. या प्रमुख मागण्यासाठी कंधार येथे सकल मातंग समाज बांधवांनी विराट मोर्चा काढण्यात आला होता.
सदरील मातंग समाजाचा मोर्चा कंधार येथील साठेनगर मार्ग निघून गांधी चौक, महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्ग, महाराणा प्रताप चौक, अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास महामानवास अभिवादन करून कंधार तहसील कार्यालयावर हा मोर्चा धडकला. नायब तहसीलदार सारंग चव्हाण यांनी मागण्याचे निवेदन स्वीकारले व शासना पर्यंत मातंग समाजाच्या भावना पोहचविल्या जाणार असे आश्वासन दिले. सकल मातंग समाज कृती समिती कंधार तालुक्याच्यावतिने आयोजित केला होता. दिलेल्या निवेदनावर मारोती मामा गायकवाड, महेंद्र कांबळे, साईनाथ मळगे, हनुमंत घोरपडे, बाबुराव टोम्पे, बालाजी कांबळे, केदारनाथ देव कांबळे फुलवळकर, बंटी गादेकर, मुन्ना बसवंते, मालोजी वाघमारे, चंद्रकांत गव्हाणे, महेश मोरे, बालाजी गायकवाड, कैलास बसवंते, शिवराज दाढेल, प्रदिप वाघमारे, वैजनाथ घोडजकर, सोपान कांबळे यांच्यासह सकल मातंग समाज कृती समितीचे सदस्य आणि मातंग समाज बांधवा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You may also like