लोकसभा निवडणूक विविध बाबींवर निर्बंध आदेश

भारत निवडणूक आयोगाने 10 मार्च 2019 रोजी लोकसभेचा सार्वत्रिक निवडणूक 2019 चा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार आदर्श आचारसंहिता अंमलात आली असून या काळात निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्‍याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्‍टीकोणातून तसेच निवडणूकीचे कामे हाताळतांना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिल्हादंडाधिकारी अरुण डोंगरे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये विविध निर्बंधाबाबत आज आदेश निर्गमीत केले आहेत.

कार्यालय / विश्रामगृह परिसरात मिरवणूका, घोषणा, सभा घेण्यास निर्बंध
जिल्‍हाधिकारी कार्यालय, सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालये, तहसिल कार्यालये आणि शासकीय कार्यालय व विश्रामगृह या ठिकाणी कोणत्‍याही प्रकारची मिरवणूक / मोर्चा काढणे, सभा घेणे, उपोषण करणे, घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्‍हणने आदी प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश 11 मार्च ते 19 एप्रिल 2019 पर्यंत अंमलात राहील.

ध्‍वनीक्षेपकाचा वापर
जिल्ह्यात कोणतीही व्‍यक्‍ती, संस्‍था पक्ष कार्यकर्ते यांना ध्‍वनीक्षेपकाचा लाऊडस्पिकरचा वापर सक्षम पोलीस अधिका-यांच्‍या पुर्व परवानगीशीवाय करता येणार नाही. फिरते वाहन रस्त्यावरुन धावत असतांना त्‍यावरील ध्‍वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत लाऊडस्पिकरचा वापर सकाळी 6 वाजे पुर्वी व रात्री 10 वाजेनंतर करता येणार नाही. हा आदेश 11 मार्च ते 19 एप्रिल 2019 पर्यंत अंमलात राहील.

वाहनाचा वापर, पक्ष कार्यालये, सार्वजनिक मालमत्‍तेची विरुपता करण्‍यास निर्बंध
जिल्ह्यात कोणत्‍याही वाहनांच्‍या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्‍त मोटारगाडया अथवा वाहने वापरण्‍यास, जिल्‍ह्यातील धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये किंवा शैक्षणिक संस्‍था व सार्वजनिक ठिकाणाच्‍या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापीत करता येणार नाही. तसेच संबंधीत पक्षांचे चित्रे / चिन्‍हांचे कापडी फलके, सार्वजनिक ठिकाणी भाषण देणे, शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्‍तेची प्रत्‍यक्ष किंवा अप्रत्‍यक्ष स्‍वरुपात विरुपता करण्‍यास निर्बंध घालण्‍यात आला आहे, हा आदेश 11 मार्च ते 19 एप्रिल 2019 पर्यंत अंमलात राहील.

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्र परिसरात 144 कलम लागू
जिल्‍ह्यात ज्या मतदान केंद्रावर मतदान होणार आहे त्‍याठिकाणी 200 मीटर परिसरातील सर्व पक्षकारांचे मंडपे, दुकाने, मोबाईल, कॉडलेस फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्‍वनीक्षेपके, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर इलेक्‍ट्रॉनिक्‍स उपकरणे, निवडणुकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त खाजगी वाहन, संबंधीत पक्षाचे चिन्‍हेंचे प्रदर्शन व निवडणूकीच्‍या कामाव्‍यतीरीक्‍त व्‍यक्‍तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्‍यात आले आहे. हा आदेश 18 एप्रिल 2019 रोजी मतदान सुरु झाल्‍यापासुन मतदान होईपर्यंत अंमलात राहील.

उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र दाखल करतांना
निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या कार्यालयाच्या परिसरात नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळी कार्यालयाच्‍या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्‍याही प्रकारच्‍या घोषणा देणे, वाद्य वाजवणे किंवा गाणी म्‍हणने आणि कोणत्‍याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास तसेच वाहनाच्‍या ताफ्यामध्‍ये 3 पेक्षा जास्‍त वाहने निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्‍या 100 मिटरचे परिसरात आणण्यास तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्‍या दालनात नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍यासाठी पाच व्‍यक्‍ती पेक्षा जास्‍त व्‍यक्‍तींना उपस्थित राहण्‍यास प्रतिबंध घालण्‍यात आले आहे. हा आदेश नांदेड जिल्‍ह्यासाठी 11 मार्च ते 29 मार्च 2019 पर्यंत अंमलात राहील.

वाहन परवान्यासाठी दस्तऐवजाबाबत आवाहन
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2019 साठी राजकीय पक्ष / उमेदवाराच्या प्रचारासाठी वाहनाचा उपयोग करण्यासाठी वाहन कक्ष प्रमुख (निवडणूक कक्ष) जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांचेकडून मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी संबंधीत अर्जदाराने राजकीय पक्ष, उमेदवाराच्या प्रचारासाठी वाहन परवाना घेण्यासाठी पुढील नमूद केलेल्या दस्तऐवजासह वाहन वापरांच्या किमान दोन दिवस आगोदर वाहन परवाण्यासाठी अर्ज वाहतूक कक्ष प्रमुख, जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांचेकडे सादर करावा.

अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे पुढील प्रमाणे आहेत. वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, वाहन चालकांचे वैध असलेले ड्रायविंग लायसेन्स, वाहनांचे वैध असलेले इन्श्युरेन्स प्रमाणपत्र, वाहन मालकांचे संमती प्रमाणपत्र, प्रदुषण प्रमाणपत्र, जिल्हा / राष्ट्रीय स्तरावर परमिट असलेल्या वाहनांसाठी प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे फिटनेस प्रमाणपत्र सादर करावे लागेल, असे आवाहन वाहतूक कक्ष प्रमुख तथा तहसिलदार (सर्वसाधारण) जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांनी केले आहे.

………..अनिल मादसवार, नांदेड.

You may also like