भारतीय संविधानात स्त्रियांच्या दुःखमुक्तीचे सौंदर्य- पंचफुला वाघमारे

स्त्री ही निसर्गतःच स्वतंत्र आहे. नैसर्गिक सौंदर्याची ती एक प्रतिनिधी आहे. पण स्त्रीला दुय्यम समजणारी, हीन लेखणारी, गुलाम बनवणारी समाजव्यवस्था सतत कार्यरत असते. भारतीय संविधानातच स्त्रियांच्या दुःखमुक्तीचे सौंदर्य आहे, असे प्रतिपादन येथील स्त्रीमुक्ती चळवळीच्या भाष्यकार पंचफुला वाघमारे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त घेण्यात आलेल्या कार्यक्रमात केले. यावेळी मंचावर डॉ. मंदाकिनी माहूरे, प्रसिद्ध लेखिका व वक्त्या प्रा. संध्या रंगारी, औरंगाबाद येथील ख्यातनाम लेखिका डॉ. द्रौपदी पंदिलवाड, शिक्षण विस्तार अधिकारी सुनंदा भद्रे, रमाईकार डॉ. करुणा जमदाडे यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.

अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र, श्रीमती भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान उमरी, मैत्री युवा फाऊंडेशन नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील पिपल्स कॉलेजच्या कै. नरहर कुरुंदकर सभागृहात जागतिक महिला दिनानिमित्त राज्यातील विविध क्षेत्रातील पंधरा कर्तृत्ववान महिलांचा मानाचा फेटा, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. महिला गौरव सोहळ्याच्या अध्यक्षपदावरुन पंचफुला वाघमारे बोलत होत्या. या सोहळ्याचे उद्घाटन डॉ. मंदाकिनी माहूरे यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलन करुन करण्यात आले. पुढे बोलताना म्हणाल्या की, स्त्रीमुक्ती चळवळीची भाषा आपण ज्यावेळी करतो त्यावेळी स्त्रीला मुक्ती कुणापासून हवी आहे हे निश्‍चित झाले पाहिजे. पुरुषांशी बरोबरी करणे म्हणजे समानता नव्हे. स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व आहे. ते पुरुषी अहंकाराच्या पितृसत्ताक समाज व्यवस्थेपासून मुक्त झाले पाहिजे असेही त्या म्हणाल्या. सोहळ्याचे औचित्य साधून नाशिक येथील डॉ. प्रतिभा जाधव यांच्या अरुणा शानबाग यांच्या जीवनावरील मी अरुणा बोलतेय! या एकपात्री नाटिकेचे सादरीकरण झाले. यावेळी सभागृह अंतर्मुख झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उषाताई ठाकूर, सुत्रसंचलन प्राचार्या रुचिरा बेटकर तर आभार मनिषा सपकाळे यांनी मानले.

यानंतर ऍड. सावित्री दमकोंडवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या महिलांच्या कविसंमेलनात उषाताई ठाकूर, रुचिरा बेटकर, मिनाक्षी यनुगवार, विमल शेंडे, ज्योती गायकवाड, प्रा. वंदना मघाडे, माया तळणकर, संध्या रायठक यांनी कविता सादर केल्या. कविसंमेलनाचे सुत्रसंचलन अनुराधा हवेलीकर यांनी केले. तब्बल पाच तास रंगलेल्या या ऐतिहासिक सोहळ्यास राज्यभरातून रणजीत गोणारकर, राम शेळके, सुनंदा वाघमारे, शिवाजी होळकर, नरेंद्र धोंगडे, निशांत पवार, नागमणी कोळनूरे, गायत्री सुर्यवंशी, अर्चना म्यानेवार, दीक्षा डाकोरे, अनिल चिमेगांवकर, पुजा सालेकर, दीपाली सरदार, बळीराम राऊत, छाया खिल्लारे, प्रेमला राऊत, शरद बुक्तरे, डॉ. प्रभाकर शेळके आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शेवटी वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सदानंद सपकाळे, अनुरत्न वाघमारे, पांडूरंग कोकुलवार, शरदचंद्र हयातनगरकर, नागोराव डोंगरे, मारोती मुंडे, कैलास धुतराज, विठ्ठलकाका जोंधळे, गजेंद्र कपाटे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत चव्हाण, अशोक मगरे, दिगांबर भाडेकर, ऍड. प्रशांत हिंगोले यांनी परिश्रम घेतले.

या पंधरा महिलांचा झाला गौरव
जागतिक महिला दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाच्यावतीने (ता. १०) सुनंदा पाटील (ठाणे), डॉ. प्रतिभा जाधव (नाशिक), सविता चंद्रे (यवतमाळ), मंगला रोकडे (धुळे), डॉ. सुजाता आडे (धुळे), कलावती राऊत (परभणी), रत्नमाला व्यवहारे (नांदेड), स्वाती कान्हेगांवकर (नांदेड), कांता कवळे (माहूर), कल्याणी डाकोरे (धर्माबाद) यांना तर मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानच्यावतीने सुनीता शेळके (जालना), डॉ. पद्मा मंदकुटे (माहूर), निर्मला ठोंबरे (नाशिक), लता शिंदे (नांदेड) आणि रेखा पंडित (नांदेड) यांना सन्मानीत करण्यात आले.

You may also like