विज्ञानाच्या दृष्टीला विवेकाची जोड द्या – डॉ.श्रीपाल सबनीस

एकूणच मानव जातीला आणि विशेषतः बालमनाला प्रिय असलेला देवतास्वरूप चांदोमामा आधुनिक काळातील विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाच्या पायाखाली आला आहे. आजच्या ज्ञान- विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या गतिमान प्रगतीमुळे चंद्र-तारे, ग्रह-वारे इत्यादी ज्या काही नवलपूर्ण गोष्टी होत्या; त्यात आता कुठलीही नवलाई राहिली नाही. वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांमुळे भूगर्भापासून खगोलापर्यंतच्या अनेक क्षेत्रांत अपूर्व असा शोध लागला आहे. उत्तरोत्तर लागत आहे. अनुशक्तीपासून परग्रहावरील जीवजंतूंपर्यंतचा शोध विज्ञानामुळे लागला. त्यामुळे मानवनिर्मित यंत्रसंस्कृतीला चालना मिळाली. परंतु मानवी संस्कृती मात्र कृत्रिम भावनांच्या गुंत्यात अडकून चाचपडत पडली आहे. या पार्श्वभूमीवर ‘विज्ञान शाप की वरदान ?’ या प्रश्नाची उकल करण्याच्या आपल्या केविलवान्या धडपडीला अर्थ आहे काय? वर्तमान काळातील माणसांच्या वैज्ञानिकदृष्टीला विवेकाची जोड असायला हवी तरच प्रगतीच्या वाटा धुंडाळता येतात आणि त्या वाटांचे माध्यम म्हणजे साहित्य होय, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध साहित्यसमीक्षक तथा 89 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

अ.भा. (अमरेंद्र-भास्कर) मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे. शाखा नांदेडच्या उद्‌घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रा. सुनील नेरलकर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून माधव राजगुरू, शिरीष चिटणीस, संजय ऐलवाड, तसेच नांदेड शाखेचे अध्यक्ष माधव चुकेवाड, प्रभाकर कानडखेडकर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना डॉ.सबनीस म्हणाले की, बालसंस्कृती ही विश्वसंस्कृती आहे. म्हणून ती जाती-धर्माच्या पलीकडची आहे. तीला जातीच्या किंवा धर्माच्या बंधनात बांधू नका कारण बालपणाची जात ही ‘निरागसता’ तर ‘निष्पाप’ हा धर्म असतो. याची जाणीव ठेवून बालसाहित्यिकांनी लेखन करावे. अशाप्रकारच्या रोखठोक प्रतिपादनात त्यांनी बालकवी माधव चुकेवाड यांच्या दंडार, ज्ञान-विज्ञान, चटक-मटक इत्यादी बालकवितांचे अनेक संदर्भ देत चौफेर फटकेबाजी केली. आपल्या तासाभराच्या अभ्यासपूर्ण भाषणात मूलगामी चिंतन केले. त्यांच्या भाषणाने श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. केंद्रीय संस्थेचे उपाध्यक्ष तथा प्रसिद्ध बालसाहित्यिक, संपादक, माधव राजगुरू यांनी बालसाहित्याची अपरिहार्यता विशद केली. तर श्री शिरीष चिटणीस यांनी जागतिक पातळीवर बालसाहित्याचे महत्त्व सांगताना, भारतात इतर देशीय लोक येऊन बालमानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करू लागले आहेत. हे आमच्या संस्कृतीचे मोठेपण आहे. असे अनेक उदाहरणं देऊन चिटणीस यांनी बालकांचे मनोबल वाढविणारे साहित्य अधिकप्रमानवर लिहिले जावे असा आशावाद व्यक्त केला.

यावेळी आनंदीविकास यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘सुगरणीचा खोपा’ गीतकार माधव चुकेवाड यांच्या बालगीतांच्या सीडीचे मान्यवरांच्या हस्ते थाटात विमोचन झाले. प्रा. सुनील नेरलकर अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, नांदेडच्या साहित्यिकांसाठी आणि चळवळीसाठी माझे सदैव योगदान राहील. बालसाहित्य चळवळीला पुढे नेण्यासाठी मी सढळ हाताने मदत करण्यास तयार आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. मान्यवरांच्या हस्ते अखिल भारतीय बालकुमार साहित्य संस्था, शाखा नांदेडच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवकांता पडोळे यांनी स्वागतगीत गायले, तर माधव चुकेवाड यांनी प्रास्ताविकपर भाषण केले. पाहुण्यांचा परिचय आणि सूत्रसंचालन संस्थेचे कार्यवाह तथा नव्या पिढीतील आघाडीचे आदिवासी साहित्यिक प्रा.डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी केले.

महात्मा फुले मंगल कार्यालयात पार पडलेल्या या उद्‌घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी सुप्रसिद्ध साहित्यिक देवीदास फुलारी, रत्नाकर वाघमारे, सुरेश आंबुलगेकर, डॉ. हंसराज वैद्य, विजय बंडेवार, सुधीर पूरकर, उमाकांत जोशी, राम शेळके, डॉ. राम जाधव, संपादक, शंतनू डोईफोडे, डॉ. पृथ्वीराज तौर, वसंत मैय्या, विजय होकर्णे, प्रा. महेश मोरे, पंडित पाटील, वीरभद्र मिरेवाड, पवन आलूरकर, डॉ. कल्पना डोंबे-जाधव, सौ. अलका चुकेवाड, डॉ. स्वाती काटे-तौर, सौ. अलका अनमुलवाड, डॉ. अनिता पुदरोड, नेहा आलूरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. डॉ. वेंकटलक्ष्मी पुरणशेट्टीवार यांनी आभार मानले. गायक संजय जोशी यांनी गायलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

You may also like