किनवट न.प.घनकचरा व्यवस्थापन साईटच्या कामाच्या चौकशीची मागणी

किनवट नगर परिषद हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन साईट विकसित करण्यासाठी सन्‌ 2007 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी संगनमत करून नगर परिषदेच्या विकास कामांसाठी आरक्षित असलेली 46 क्रमांकाची 4 हेक्टर 88 आर ही मालमत्ता ठरवलेल्या रकमेपेक्षा अधिकचा मोबदला देऊन खरेदी केली हाेती. ही मालमत्ता अद्यापपर्यंत नगर परिषदेच्या नावावर झालेली नसतांनाही, आता या जागेवर 1 कोटी 44 लाख 562 रुपये खर्च करून घनकचरा व्यवस्थापन सर्वस्तर प्रकल्प उभारल्या जात आहे. सध्या या प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने, वरीष्ठ पातळीवरून या कामांची चौकशी करावी, अशी मागणी शहरातील कांही जागृत नागरीकांनी केली आहे.

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी निविदा निघाल्यानंतर या कामासाठी स्पर्धा झालेली नाही. सदरील काम हे सर्व नगरसेवकांनी संगनमत करून पुसद (जि.यवतमाळ) येथील बी.के.कंस्ट्रक्शन कंपनीच्या नावावर घेतले आहे. प्रत्यक्षात हे काम मात्र कांही नगरसेवक व अध्यक्ष मिळून करत असल्याची नागरीकांत चर्चा आहे. या कामासाठी स्पर्धा न झाल्याने या कामाची निविदा साडेचार टक्के जास्त दराने मंजूर करण्यात आलेली आहे. हे काम अप्रत्यक्षरित्या अध्यक्षांसह नगरसेवकच करत असल्याने, अत्यंत सुमार दर्जाचे काम होत आहे. या कामावर वापरले जात असलेले बांधकाम साहित्य हे निकृष्टप्रतीचे आहे. या कामासाठी मातीमिश्रीत वाळू, हलक्या दर्जाचे सिमेंट वापरले जात आहे. सिमेंटच्या झालेल्या कामावर क्युरींग फारच कमी करण्यात आलेली आहे.

घनकचरा साईटच्या अंतर्गत रस्त्यासाठी त्याच जमिनीवरील मुरूम काढून ती वापरली जात आहे; त्यानंतर झालेल्या खड्ड्यांमध्ये घनकचरा टाकून तो खड्डा बुजविल्या जात आहे.. या कामासंदर्भातील कार्य आदेश जा.क्र. 2389/2018 असा असून, कार्यारंभ आदेश 25 जुलै 2018 आहे. हे काम पूर्ण करण्याची मुदत 180 दिवसाची आहे. परंतु मुदतीचा कालावधी संपूनही हे काम अद्यापही अर्धवट अवस्थेतच आहे. हे काम अप्रत्यक्षरित्या नगरसेवकच करीत असल्याने, या कामांची देयके काढण्यात कुठलीही अडचण येत नाही, हे विशेष आहे.

तत्कालीन कार्यालयीन अधिक्षक व विद्यमान स्वीकृत नगरसेवक यांच्या नांवावर व त्यांच्या भाऊ-बहीणीच्या नांवावर असलेली 4 हेक्टर 88 आर एवढी जमीन नगर परिषदेने सन 2007 साली खरेदी केली. या जमिनीसाठी जेवढी रक्कम ठरविण्यात आली होती. त्यापेक्षा अधिकची रक्कम नगर परिषदेने अदा केलेली आहे. ही रक्कम तत्कालीन अधिक्षक व विद्यमान स्वीकृत नगरसेवकाच्या मुलाने स्वत:च्या नांवे अधिकारपत्र करून उचलली आहे.

विशेष म्हणजे नगर परिषदेने खरेदी केलेल्या या जमिनीत पाटबंधारे विभागाने कालवा काढलेला आहे. यासाठी त्या विभागाने 35 आर एवढी जमीन खरेदी करून त्याचा मोबदलाही दिलेला आहे. परंतु त्यावेळी शेतमालकांनी 35 आर एवढी जमीन न वगळता संपूर्ण जमीन नगर परिषदेला विक्री केली आहे. ही जमीन अद्यापपर्यंत नगर परिषदेने आपल्या नावावर करून घेतलेली नाही. या जमीनीची रजिस्ट्री करण्याकरीता जवळपास साडेचार लाखाचा खर्च अपेक्षित आहे. परंतु एवढी रक्कमही नगर परिषदेकडे उपलब्ध नसल्याने रजिस्ट्री करण्याचे काम ठप्प पडले आहे. पुढे चालून या जमीनीचे वारसदार हे सदरील जमीनीवर आपलीच जमीन आहे म्हणून दावा ठोकू शकतात; असे झाल्यास नगर परिषदेने फार मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या दोन्ही परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची चौकशी करून दोषींवर फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करावी, अशी मागणी शहरातील नागरीकांनी केली आहे.

अरुण तम्मडवार, किनवट.

You may also like