यंदाच्या लोकसभा निवडणूकीत अशोक चव्हाणांचा किल्ला धारातिर्थी पडणार – मुख्यमंत्री

आदर्श हा एकच घोटाळा नसून डायरी भरेल एवढे घोटाळे आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत कांही छोट्याश्या फरकाने नांदेडची लोकसभेची जागा शिल्लक राहिली पण यंदा अशोक चव्हाण यांचा किल्ला धारातिर्थी पडल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आज नांदेड शहरात लोकसभा निवडणुकीतील बुथ कार्यकर्त्यांसोबत बोलतांना देवेंद्र फडणवीस सांगत होते. व्यासपीठावर आ.राम पाटील रातोळीकर, आ.प्रताप पाटील चिखलीकर, आ.डॉ. तुषार राठोड, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष भास्करराव पाटील खतगावकर,माजी खा.डी.बी. पाटील महानगराध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे, महानगरपालिकेच्या विरोधी पक्ष नेत्या गुरूप्रितकौर सोढी, माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर, दिलीप कंदकुर्ते, धनाजीराव देशमुख, बापुसाहेब देशमुख, गंगाधर जोशी, राजेश पवार, शामसुंदर शिंदे आदी उपस्थित होते. याप्रसंगी पुढे बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले मोदी बद्दल वाईट बोलणाऱ्यांनी सुर्यावर थुंकल्यानंतर ते थुंक आपल्याच अंगावर पडते याची जाणीव ठेवायला हवी. नांदेड मध्ये किंबहुना महाराष्ट्रामध्ये माझे सर्वच आहे असा गोड गैरसमज अशोक चव्हाणांचा आहे. यामुळे ते कोणासोबत सुध्दा छान बोलत नसतात. आदर्श घोटाळ्यासह डायरी भरून लिहिता येईल एवढे घोटाळे आहेत. त्यात प्रत्येक पैशाचा हिशोब घेतला जाणार आहे. त्यामुळे कोणीच आज खुश होण्याची गरज नाही. नांदेडमध्ये येवून छगन भुजबळांनी केलेल्या वक्तव्यावर बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले महाराष्ट्राचा पैसा आपल्या घराच्या तिजोरीत टाकला होता म्हणून भुजबळांना तुरूंगात जावे लागले. तीन वर्षे तुरूंगवास भोगल्यानंतर आता फक्त जामीन झाली आहे. तुटले अजूनही नाहीत असा उल्लेख देवेंद्र फडणवीस यांनी केला.

पंतप्रधान मोदींनी केंद्रातून पाठवलेला एक रुपया शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यासाठी कडेकोट बंदोबस्त लावला आणि त्यामुळे आज अनेक लोकांना त्याचा उपभोग घेता आला. पुर्वी 45 टक्के घरात शौचालय होती आता ती 98 टक्के झाली आहेत. गरीब माणसांच्या आरोग्य सुविधांसाठी अनेक सोयी दिल्या. त्यात ऑपरेशन सुध्दा आहे. 60 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या 2 कोटी कामगारांना दरमहा 3 हजार रुपये देण्याची योजना भाजपाने आणली. आयकर आणि जीएसटी यामुळे चोरी करणाऱ्यांना त्रास झाला पण सर्व सामान्य जनतेसाठी फक्त जीएसटीमधून दरवर्षी 1 लाख कोटी रुपये जमा होत आहेत आणि देशाच्या तिजोरीत भरलेल्या पैसा हा भारताच्या सर्वसामान्य माणसाचा आहे. मागणी सरकारच्या काळात गरीबांचा विचार होत नव्हाता. समाजाची दरी वाढली होती आणि म्हणून मोदींनी फक्त गरीबांसाठी काम करणार असा प्रण करूच काम सुरू केले आणि ते अव्याहत सुरू आहे.

2019 ची निवडणूक ही भाजपला टिकवण्यासाठीची निवडून नाही तर ती जिंकण्यासाठीच आहे. जुन्या भविष्यवाणीचा आधार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 21 वे शतक हे भारताचे आहे अशी भविष्यवाणी आहे. त्या भविष्यवाणीसाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे. 21 वे शतक हे भारतासाठी प्रगतीचा सुवर्णकाळ आहे. सन 2035 पर्यंत भाजपाचेच सरकार देशात राहिल यासाठी बुथ कार्यक्रर्त्यांनी प्रयत्न करायचा आहे. या 15 वर्षांमध्ये आपली झालेली चुक मोठी किंमत मागणारी असेल म्हणून पुर्ण शर्तीने प्रयत्न करा कारण ही निवडणुक देशाचे भविष्य ठरवणारी आहे. आपण केलेल्या मेहनतीने येणाऱ्या काळात भाजपला पाठीमागे टाकण्याची कोणाची हिंमत होणार नाही. लोकसभेच्या निवडणूकीचे बिगुल वाजलेले आहे. तेंव्हा या बिगुलाची ध्वनी देशाचे अस्तिव टिकवण्यासाठी आहे. त्या ध्वनीला सकारात्मक प्रतिसाद द्या कारण देशाचे अस्तिव असेल तर पक्षाचे अस्तिव असेल म्हणून प्रत्येकाने जिंकण्यासाठीच काम करा.

याप्रसंगी आपले मत व्यक्त करतांना आ.प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले कांही दिवसांपुर्वी मी अशोक चव्हाणांसोबत एका संयुक्त व्यासपीठावरून मराठा समाजाचा वापर मागील शासनांनी केला पण आरक्षण दिले नाही या संदर्भाने मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले असता त्या बाबत बोलण्याची हिंमत अशोक चव्हाणांची झाली नाही. पुढे एका कार्यक्रमात शरद पवार यांच्यासोबत बोलतांना मी अशोक चव्हाणांनी मागे गुरु गुरू असतो, चेला चेला असतो असे वक्तव्य केले त्याबद्दल बोलतांना मी तुम्ही पाचवी वर्गात होतात मी चौथीच्या वर्गात होतो असे सांगितले होते. आज भारतीय जनता पार्टी गावा-गावात पोहचली आहे. तेंव्हा व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येकाला माझी हात जोडूून विनंती आहे आपण सर्व एकत्र होवून काम केले तर अशोक चव्हाणांचा पराभव होणारच आहे.

याप्रसंगी बोलतांना भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले मोदींच्या सांगण्याप्रमाणे बुथ जिता उसने चुनाव जिता म्हणून सर्वांनी एकत्रीत प्रयत्न करण्याची गरज आहे. अशोक चव्हाणांनी सुडबुध्दीने बंद केलेली बॅंक म्हणजेच जिल्हा बॅंक लोकसभेची जागा नांदेडमध्ये यंदा भारतीय जनता पार्टीच जिंकणार हे सांगतांना भास्करराव पाटील खतगावकर यांनी आपल्यासोबत कोणाची किती मते आहेत याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांसमोर केला आणि कांही मागण्यापण सादर केल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन भाजपाचे प्रविण साले यांनी केले.

You may also like