कुरुळ्यातील पाणी प्रश्न राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे

लोक बिनधास्तपणे चर्चेत गुंग

कुरुळा व परिसरात गेली अनेक वर्षापासून राजकीय स्थित्यंतरे आली अन गेली परंतु निवडणूका आल्या की जनतेचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न मात्र भाषणातून अगदी रंगवून आणि सोयीस्करपणे गरजेनुसार मांडला जातो. परंतु त्यासाठी आवश्यक असणारी हालचाल मात्र कुठल्याही राजकीय नेत्यांकडून होताना दिसत नाही.म्हणून पाणीप्रश्न हा निवडणूक काळातील राजकीय पुढारी आणि नेते यांच्या डोळयात अंजन घालणारे ठरेल अशा आशयाची चर्चा बिनधास्तपणे सुरू आहे.

कुरुळा परिसरात महसूल मंडळाअंतर्गत 22 गावांचा समावेश होत असून एकूण भौगोलिक क्षेत्र 14307.44 हेक्ट.आहे त्यापैकी 12730.55 हेक्ट .एवढे लागवडियोग्य क्षेत्र आहे.तर सिंचन विहिरींचा विचार करता साधारणतः 200 च विहिरी असल्याचे समजते.एकूण भूभागाचा विचार करता अत्यल्प असलेल्या सिंचन क्षेत्रामुळे उत्त्पन्नही समाधानकारक मिळत नाही त्यामुळे शेती व्यवसाय तोट्यात जात आहे.केवळ लहरी पावसावरच शेती अवलंबून असल्यामुळे दिवसेंदिवस शेतकऱ्यांत शेतीविषयीची आत्मीयता कमी होतानाचे चित्र दिसत आहे.आजघडिला कुरळा परिसर सिंचनाच्या अभावी परिसरातील तरुण शेती व्यवसायापासून गौण स्थान देत दूर जाताना दिसत आहे.तर पोटाची खळगी भरण्यासाठी खरीप हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर शेतकरी,शेतमजुरांची अनेक कुटुंबे शहरी भागात कामासाठी स्थलांतरित झालीआहेत.सिंचनाची सोय झाल्यास बेरोजगारीचे प्रमाण कमी होऊ शकते, भूमिहीन शेतमजुरांच्या हाताला काम मिळू शकते,कृषिप्रधान देश म्हणून कार्य तरुणांकडून अपेक्षित राहील,अन्नधान्यात वाढ होऊन सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.

त्यामुळे राजकीय इच्छाशक्ती असणारा भगीरथ लोकप्रतिनिधी कुरुळा भागासाठी कुणी होईल का?असा भाबडा प्रश्न शेतकऱ्यांच्या चर्चेतून ऐकावयास मिळत आहे.कुरुळ्यापासून जवळच असलेल्या लिंबोटी ऊर्ध्व मानार प्रकल्पाचे 1985 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन साधारणतः500 कोटींचा खर्च झाला परंतु धरण उशाला आणि कोरड घशाला अशीच परिस्थिती कुरुळ्यासह परिसरातील गावांची आहे.अद्यापपावेतो राजकीय इच्छाशक्तींनी त्यासाठी केलेले भाषणी प्रयत्न हवेतच विरलेले आहेत.तर दुसरीकडे जीवन प्राधिकरणाच्या पाण्याच्या टाक्या शोभेच्या वस्तू बनून राहिल्या आहेत.गेल्या अनेकवर्षापासून आमदार झालेल्या लोकप्रतिनिधी कडे जनता आशा ठेवून तहानललीच आहे . .केवळ कागदावरच खळाळणारे पाणी प्रत्यक्षात मात्र मृगजळाभास निर्माण करणारे असल्याच मत गावकऱ्यांतुन व्यक्त होत आहे. तेंव्हा पाण्याचे राजकारण करण्यापेक्षा राजकारणाच्या सहाय्याने कुरुळा भागात पाणी कसे आणता येईल यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न करण्याची गरज आहे.शेतकऱ्यांसाठी मानसिक व आर्थिक आधार होऊन पिण्याच्या पाण्याबरोबरच सिंचनासाठी पाण्याच्या उपलब्धतेसाठी धोरणात्मक निर्णय घेऊ शकेल अश्या नवीन राजकीय चेहरा असणाऱ्या नेत्याची अपेक्षा आता कुरुळवासीयांना आहे.अस असलं तरी येणाऱ्या आगामी विधानसभा आणि लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे राजकारण नक्कीच तापणार हे मात्र अटळ आहे.

You may also like