लोकसभेसाठी किनवट विधानसभा मतदारसंघात 2 लाख ५७ हजार ५४४ मतदार

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रशासनाच्या वतीने निवडणूक विभाग सज्ज झाला असून १५ हिंगोली लोकसभा मतदार संघा अंतर्गत ८३ किनवट विधानसभा मतदारसंघात ३१ जानेवारी अखेर दोन लाख ५७ हजार ५४४ मतदार असल्याची माहिती किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपविभाग किनवट अंतर्गत माहिती देण्यासाठी मंगळवारी (दि.12) सकाळी 11.30 वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गोयल यांनी ही माहिती दिली. यावेळी किनवटचे तहसीलदार नरेंद्र देशमुख व माहूरचे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर उपस्थित होते. हिंगोली लोकसभा मतदार संघात किनवट या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी ३२८ मतदान केंद्र आहेत. २ लाख ५७ हजार ५४४ एकूण मतदार असून त्यापैकी एक लाख ३२ हजार ९४५ पुरुष मतदार आणि एक लाख २४ हजार ५९१ स्त्री मतदार आणि आठ इतर मतदार आहेत. निवडणुकीसाठी ३३ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, विविध विभागांसाठी नोडल ऑफिसर, सीमेवरील ६ तपासणी नाके, ८ फिरथेपथक, वाहनांची व्यवस्था आदींचे नियोजन करण्यात आले आहे. अतिदुर्गम, डोंगरी क्षेत्र व सीमावर्ती भाग असल्याने येथे चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तहसीलदार नरेंद्र देशमुख यांच्या नेतृत्वात आचारसंहिता कक्ष आणि कायदा व सुव्यवस्था कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

” ही निवडणूक प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना आणि उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ” – अभिनव गोयल , सहायक जिल्हाधिकारी, किनवट

You may also like