वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी शिवसेनेचे सचिन नाईक

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-सेनेने राज्यातील विविध महामंडळाच्या पदांवर नियुक्त्या केल्या असून, किनवट येथील शिवसेनेचे युवानेते सचिन नाईक यांची वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती केल्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. सचिन नाईक यांच्या नियुक्तीबद्दल किनवट-माहूर तालुक्यातील शिवसैनिकांसह बंजारा समाजाने आनंद व्यक्त केला असून, सचिन नाईक यांची महामंडळावरील नियुक्ती म्हणजे आगामी किनवट विधानसभेची उमेदवारी असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सचिन नाईक यांची महामंडळावर नियुक्ती झाली असून, या नियुक्तीमुळे शिवसेनेच्या लोकसभा उमेदवाराला सचिन नाईक यांचा मोठा फायदा होणार आहे. बंजाराबहुल किनवट-माहूर तालुक्यात सचिन नाईक यांचा दांडगा जनसंपर्क आहे. त्यांच्या पाठीशी तरुणवर्गाची मोठी फळी कार्यरत असून, तरुण-तडफदार नेता म्हणून त्यांची ओळख आहे. सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली किनवट-माहूर तालुक्यात गावोगावी शिवसेनेच्या शाखा स्थापन झाल्या आहेत. गोरगरीब जनतेच्या हितासाठी सचिन नाईक हे वेळोवेळी रस्त्यावर उतरून संघर्ष केल्यामुळे, लोकसभेच्या निवडणुकीत सचिन नाईक यांचा पक्षाला निश्चितपणे लाभ होणार असल्याचे बोलले जात आहे. या नियुक्तीबद्दल किनवट-माहूर तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच बंजारा समाजाकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार मानल्या जात असून, सचिन नाईक यांचे अभिनंदन केले जात आहे. शासनाने वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळासाठी 300 कोटी रुपयांची तरतूद केलेली असून, नाईक यांच्या नियुक्तीमुळे किनवट-माहूर तालुक्यातील बंजारा समाजाला याचा मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकतो.

You may also like