सचखंड श्री हजुर साहिब ते गुरुद्वारा श्री लंगर साहिब

रस्त्यावरील अतिक्रमणे मनपाने काढली

नांदेड वाघाळा महानगरपालिकेने शहरातील रस्त्यावरील दुकाने आणि हातगाडे जप्त करून रहदारीस होणारा अडथळा बऱ्याच प्रमाणात दुरू केल्याचे कामकाज मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. याच प्रकरणात मनपा पथकाने सचखंड श्री हजुर साहिब ते गुरुद्वारा श्री लंगरसाहिब या रस्त्यावरील दोन्ही बाजूंना रस्त्यावर रहदारीला अडथळा करणारे आणि पादचारी रस्त्यावर थाटलेली दुकाने, दुकानाबाहेर सजविलेले साहित्य जप्त केले.

कांही दिवसांतच होळी हा सण येत आहे. होळी सणानिमित्त देशभरातून भाविक सचखंड श्री हजुर साहिबजींच्या दर्शनासाठी येतात. त्यात सचखंड श्री हजुर साहिब ते गुरुद्वारा श्री लंगरसाहिब या रस्त्यावर मोठी वर्दळ असते. अनेक वर्षांपासून या रस्त्यावर अतिक्रमण करून थाटलेली दुकाने हा रहदारीसाठी मोठा विषय आहे. या संदर्भाने उच्चन्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिका दाखल झालेली आहे. त्या याचिकेची सुनावणी 23 मार्च 2019 रोजी नियोजित आहे. त्या अगोदरच महानगरपालिकेने या रस्त्यावरचे अतिक्रमण काढले आहे. महानगरपालिकेने आज अतिक्रमण काढले असले तरी हे अतिक्रमण उद्या पुन्हा दिसणार नाही यासाठी सुध्दा कांही तरी उपाययोजना करण्याची अपेक्षा जनता व्यक्त करीत आहे.

ही अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही अतिक्रमण विभागाचे प्रमुख रईस पाशा, सहाय्यक आयुक्त गुलाम सादिक,उद्यान अधिक्षक मिर्झा फरतुल्ला बेग, पशु शल्य चिकित्सक डॉ.मो.रईसोद्दीन, क्षेत्रीय अधिकारी सुधीर इंगोले, विलास मटपल्लेवार, सोनसळे, प्रकाश गच्चे यांच्यासह अतिक्रमण पथकाचे सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

You may also like